Vadgaon Maval : नियोजित प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी जागा मोकळी करून घ्या; आमदार सुनील शेळके यांच्या सूचना

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील नियोजित नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामाला लवकरच शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 27) आमदार सुनील शेळके यांनी अधिकाऱ्यांसमवेत जागेची पाहणी करून बांधकामासाठी तात्काळ जागा मोकळी करण्याची सूचना केली. नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सर्व शासकीय कार्यालयांचे स्थलांतर होणार असून नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व शासकीय कामे करण्याची सोय होणार आहे.

या वेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वैशाली भुजबळ उपस्थित होते.

वडगाव येथील तहसील कार्यालयाची इमारत असलेल्या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत बांधून सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणण्याच्या दृष्टीने ही नूतन इमारत बांधण्यात येणार आहे. आमदार शेळके यांनी यासाठी विशेष पाठपुरावा करून प्रशासकीय इमारतीसाठी 18 कोटी 45 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.

या कामाची निविदा प्रक्रियाही सुरू आहे व लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.  येथील पोलिस ठाण्याचीही नुतन इमारत होणार आहे. त्यामुळे या आवारातील तहसील कार्यालयासह पोलिस ठाणे, वनविभाग, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग ही कार्यालये स्थलांतरित करण्याची लेखी सूचनाही वरीष्ठ कार्यालयाकडून आली होती. त्यादृष्टीने संबंधित कार्यालये तात्पुरती स्थलांतरित करून नूतन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे.

यासाठी आमदार शेळके यांच्यासह तहसीलदार बर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी भुजबळ यांनी संबंधित जागेचे मोजमाप घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तूर्त आवश्यक असलेली जागा मोकळी करून देण्याची सूचना देऊन प्रत्यक्ष कामास लवकर सुरुवात करावी, अशी सूचना आमदार शेळके यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.