Hinjwadi News: भाजपमधील ‘त्या’ नगरसेवकांचा ‘डीएनए’ राष्ट्रवादी काँग्रेसचाच – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज – गेल्या पाच वर्षांत वातावरण वेगळे होते. आमचेच काही लोक घेऊन ते (भाजप) पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिकेत सत्तेवर आले. ते स्वतःच्या कर्तृत्ववावर सत्तेत आले नव्हते. आमच्याकडचेच लोक घेऊन सत्तेत आले. भाजपमधील ‘त्या’नगरसेवकांचा ओरिजनल डीएनए ‘एनसीपी’ आणि काँग्रेसचाच असल्याचे विधान बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच आगामी निवडणुकीत पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकर राष्ट्रवादी काँग्रेसला ‘मेरिटवर’ पास करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हिंजवडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत, गणवेश वाटप आणि शालेय साहित्याचे वाटप आज (सोमवारी) खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक तोंडावर आली असताना शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शहरात लक्ष घालणार आहेत. आपणही लक्ष घालणार का असा प्रश्न विचारला असता खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गटबाजी सगळ्याच पक्षात असते. त्यात काही गैर नाही. आणि त्याची एखादी मोठी बातमी झाली म्हणजे त्यात सगळे तथ्य असते असेही नाही.”

त्यानंतर सुळे भाजपवर निशाणा साधत म्हणाल्या “गेल्या पाच वर्षात वातावरण वेगळे होते. आमचेच काही लोक घेऊन ते (भाजप) सत्तेवर आले. भाजप स्वतःच्या कर्तृत्ववावर सत्तेत आला नाही. आमच्याकडेच लोक घेऊन सत्तेत आले. भाजपमधील ‘त्या’ नगरसेवकांचा ओरिजनल ‘डीएनए’ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचाच आहे. त्यामुळे पाच वर्षे वेगळी सत्ता होती असे काही नाही. अजितदादांचे नेतृत्व नसेल तर त्या भागात वेगाने विकास होत नाही.”

“पुणे, पिंपरी-चिंचवडच्या लोकांनी हे पाहिले आहे. हे लोक अनुभवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणे, पिंपरीतील नागरिकांची सेवा केली. पुन्हा विकासाचे ‘व्हिजन’ घेऊन आम्ही प्रांजळपणे लोकांसमोर जाणार आहोत. यावेळी पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकर राष्ट्रवादी काँग्रेसला मेरिटवर पास करतील. तेही आम्ही केलेल्या विकास कामांच्या जोरावरच” असा विश्वासही खासदार सुळे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.