Bhosari Crime News : ….तरीही पोलिसांनी त्याला शिताफीने ठोकल्या बेड्या!

एमपीसी न्यूज – प्रेयसीचा खून करून सुरुवातीला नालासोपारा आणि तिथून पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रियकराला भोसरी पोलिसांनी अटक केली. आरोपीने युक्ती करून स्वतःचा मोबाईल फोन बंद ठेवला आणि दुसऱ्याच्या मोबाईलवरून भोसरीतील मित्राला फोन केला. दरम्यान, त्याने केवळ फोनच नाही तर फोनवर खुनाची कबुली देखील दिली. ही बाब पोलिसांना कळताच आरोपीचा माग काढत नालासोपारा येथील ठावठिकाणा शोधून त्याला अटक करण्यात आली.

कलावती उर्फ कल्पना घोडीबा सुरावार (वय 38, रा. धावडेवस्ती, भोसरी. मूळ रा. मुखेड, जि. नांदेड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. बाजीराव विश्वनाथ साबळे (रा. जामखेड, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता कलावती हिचा खून झाल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. मयत कलावती ही घरी एकटी असताना तिच्यावर धारदार हत्याराने शरीरावर सर्व ठिकाणी वार करुन जीवे ठार मारण्यात आले होते.

मयताचा मुलगा नामदेव सुरावार याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. कलावती हिचे यापूर्वी बाजीराव विश्वनाथ साबळे (रा. जामखेड जि. अहमदनगर) याच्या बरोबर प्रेमसंबंध होते. तो तिला भेटण्यास येत असे. पोलिसांनी मयताचा मोबाईल व संशयीत इसमाच्या मोबाईलची माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषण केले.

या माहितीच्या आधारे तपास केला असता, संशयीत आरोपी घटनेच्या वेळी मयत महिलेस भेटण्यासाठी तिच्या घरी आल्याचे पोलिसांना कळाले. परंतु, घटना घडल्यापासून संशयीत इसमाचा मोबाईल बंद होता व तो घटनास्थळावरून पळून गेला होता, त्यामुळेच त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला .

भोसरी पोलिसांनी दोन पथके आरोपीच्या मागावर पाठवली. आरोपीच्या मूळ गावी जाऊन देखील पोलिसांनी चौकशी केली. दरम्यान आरोपीने घटनेची खबरबात घेण्यासाठी दुसऱ्याच्या फोनवरून त्याच्या भोसरीतील मित्राला फोन केला आणि त्याने कलावतीचा खून केल्याची कबुली दिली.

दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा ठावठिकाणा शोधला आणि थेट पालघर जिल्ह्यातील नालासोपारा गाठले. तिथे दोन दिवस वेषांतर करून आरोपी बाजीराव रेल्वेने पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला बेड्या ठोकल्या. प्राथमिक चौकशीतच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

मयत महिलेसोबत मिळून त्याने केला होता एक खून

आरोपी बाजीराव विश्वनाथ साबळे व मयत महिला हे पाटोदा येथे राहण्यास असताना त्या दोघात अनेक दिवस अनैतिक संबंध होते. मयत महिलेचा नवरा घोंडीबा सुरावार त्यांच्यासाठी अडसर होत होता. त्यामुळे आरोपी बाजीराव व मयत महिला यांनी मिळून मयत महिलेचा पती घोंडीबा सुरावार याचा सन 2016 मध्ये पाटोदा जि. बीड येथे निघृण खून केला. त्याचा मृतदेह सौताडा ता. पाटोदा येथील खोल दरीत फेकून दिला होता. या गुन्हयात बाजीराव विश्वनाथ साबळे व कलावती उर्फ कल्पना धोंडीबा सुरावार दोघांना अटक झाली होती. सध्या दोघेही जामीनावर मुक्त होते.

…म्हणून बाजीरावने केला कलावतीचा खून

सन 2019 मध्ये मयत महिला कलावती ही भोसरी येथे राहण्यास आली होती. आरोपी बाजीराव हा अधून मधून तिला भेटण्यासाठी येत असे व तेथे तिच्या बरोबर राहत असे. आरोपी बाजीराव विश्वनाथ साबळे यास मयत महिला ही सतत फोनवर व्यस्त असल्याचे दिसून आल्याने तसेच तिचे इतर कोणाशी तरी प्रेमसंबंध सुरु झाले असावेत याचा संशय आरोपीला आला व त्यावरुन त्याने फोनवरुन तिच्याशी भांडणही केले.

त्यावेळी मयत महिलेने ‘तु सतत माझ्याशी भांडण करणार असशील तर माझ्या सोबत संबंध तोडून टाक. तसेच तु मला 15 लाख रुपये दे. नाहीतर मी माझ्या मुलास तुझ्या विरोधात कोर्टात साक्ष द्यायला सांगेल.’ कलावतीमुळे आपण तिचा नवरा घोंडीबा सुरावार याचा खून केला व आता ती सोडून जाणार तसेच आपल्या विरुध्द कोर्टात मुलाला साक्ष द्यायला सांगणार याचा राग मनात धरुन कलावती हिचा बाजीरावने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, सहा पोलीस निरिक्षक सिध्देश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र भवारी, पोलीस अंमलदार जी.एन. हिंगे, एस. डी. देवकर, जी.पी.सावंत, एस.ए. जाधव, ए.एस. जाधव, एस.व्ही. सातपुते, तसेच दरोडा विरोधी पथकाचे एस. एल. रासकर, व्ही.ए.वीर, पो. शि. कदम यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.