Mumbai : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘पुणे मेट्रो’च्या कोचचे अनावरण

एमपीसी न्यूज – ‘पुणे मेट्रो’च्या कोचचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात झाले. पुणेकर आतुरतेने वाट पाहत असलेल्या मेट्रोचे काम वेगात सुरु असून दोन मेट्रोचे संच पुण्याकडे रवाना झाले आहेत. लवकरच मेट्रोची चाचणी होऊन मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मेट्रो कोचच्या उदघाटनप्रसंगी नगरविकासमंत्री व गृहमंत्री एकनाथ शिंदे, महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रमण्यम उपस्थित होते.

पुणे मेट्रोचे काम सध्या वेगात सुरू असून या मेट्रोची आता प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. नागपूर येथून मेट्रोच्या कोचचे आगमन झाले आहे. प्रत्येक मेट्रो ट्रेन ही तीन कोचची आहे. एका मेट्रो ट्रेनमधून 950 ते 970 प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात. तीन कोचपैकी एक कोच महिलांसाठी राखीव असून तीनही कोच आतून एकमेकांना जोडलेले असल्यामुळे प्रवाशांना सहज एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाणे शक्य होणार आहे. स्टेनलेस स्टीलने बनवलेले हे कोच वजनाला हलके असून यामध्ये अत्याधुनिक एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. बाहेरील प्रकाशानुसार या दिव्यांची तीव्रता कमी-अधिक करणारी यंत्रणाही यात बसवण्यात आली आहे. ताशी कमाल 90 किमी वेगाने धावू शकणाऱ्या या गाडीच्या कोचमध्ये प्रवाशांसाठी मोबाइल व लॅपटॉप चार्जिंग सुविधा पुरवण्यात आली असून दृकश्राव्य संदेशप्रणाली असणार आहे.

पुण्यात दाखल झालेले मेट्रोचे कोच लवकरच मेट्रोच्या उन्नत मार्गावर चढवण्यात येतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष गाडी धावण्याच्या चाचण्या घेण्यात येतील. पुणे मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत असल्याबद्दल नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. जून 2017 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या अडीच वर्षांच्या कालावधीत हा मार्ग मेट्रोची चाचणी घेण्यासाठी आता सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. सिव्हिल बांधकाम, मार्ग टाकण्याचे काम, विजेच्या तारांचे काम, सिग्नल व अन्य कामे 30 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आली आहेत. याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.