Mumbai : पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचा ‘हिरो 2019 अवॉर्ड’ने गौरव

एमपीसी न्यूज – भारतातील अग्निशामक विभागात काम करणाऱ्या जवानांना मुंबई येथील फायर अँड सेफ्टी कंपनीतर्फे दिला जाणारा ‘हिरो 2019 अवॉर्ड’ यावर्षी पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला प्रदान करण्यात आला. 2019 मध्ये आलेल्या पुराच्या परिस्थितीत केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याचे संचालक तथा अग्निशमन सल्लागार प्रभात रहांगदळे, डायरेक्टर फायर अँड सेफ्टी मुंबई निरंजन गुप्ता यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना ‘हिरो 2019 अवॉर्ड’ या पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उप-अग्निशमन अधिकारी अशोक कानडे, सेवानिवृत्त लिडिंग फायरमन भगवान यमगर, फायरमन विवेक खांदेवाड, फायरमन लक्ष्मण होवाळे, वाहन चालक विशाल बाणेकर आदींना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमांमध्ये मुंबई, दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, गोवा, नाशिक, नागपूर, पुणे आणि पिंपरी चिंचवड अग्निशामक विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाच्या जवानांनी पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या पुरामध्ये आठवडाभरापेक्षा जास्त कालावधी अहोरात्र मेहनत घेऊन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम केले. तसेच सांगली कोल्हापूर येथे आलेल्या पुरातील नागरिकांच्या बचावासाठी देखील पिंपरी चिंचवड अग्निशमन विभाग धावून गेला. त्यांच्या या कामगिरीबद्दल मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.