Mumbai : राज्यातील शहरी भागात आज मध्यरात्रीपासून ‘जमावबंदी’

संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज – राज्यातील वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील शहरी भागात आज मध्यरात्रीपासून  कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ( रविवारी ) घेतला.

दरम्यान, जिद्द, धैर्य आणि निश्चयाचे अद्भुत दर्शन ‘जनता कर्फ्यू’च्या माध्यमातून घडविल्याचे सांगत मुख्यानमंत्र्यांनी राज्यातील जनतेचे कौतुक केले. हा कर्फ्यू उद्या पहाटेपर्यंत असाच पाळावा.  आज मध्यरात्रीपासून परदेशातून येणारी सर्व विमानसेवा बंद करण्यात आली असल्याचेही नमूद करून प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्यात आज सकाळपासून जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्याला राज्यातील जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला. मात्र, तरीही कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन  राज्यात 31 मार्च पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात  आल्याची माहिती दिली.

अत्यावश्यक सेवेसाठीच बसेसचा वापर

राज्यात 144 कलम लागू करण्यात येत आहे. रेल्वे , खासगी आणि एसटी बसेस बंद व लोकल सेवाही बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना प्रवास करता यावा म्हणून शहरांतर्गत बस सेवा सध्या सुरु राहील. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, औषधी, वीजपुरवठा, करणारी केंद्रे सुरुच राहतील, असे स्पष्ट करून वित्तीय सेवा देणाऱ्या शेअर बाजार आणि बँकासारख्या संस्थाही सुरुच राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसासाठा

जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे. त्याची अजिबात कमतरता नाही तसेच ही दुकाने किंवा या सेवा बंद राहणार नाहीत, त्यामुळे त्याचा साठा करून ठेऊ नका. अजिबात घाबरून जाऊ नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले. संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर आहे. निश्चय, संयम, जिद्द आणि स्वंयशिस्त या माध्यमातून आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू, असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा मनापासून सहकार्य करण्याचे, शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे.

रोगाचा गुणाकार होऊ देऊ नका

मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना विषाणुमुळे आपण शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्यातरी सर्वांच्या परिक्षेचा कठीण काळ आता सुरु झाला आहे. सर्वांनी स्वंयशिस्तीने, सांगितलेले स्वच्छतेचे आणि इतर नियम पाळून वागण्याची नितांत गरज आहे. आतापर्यंत आपण सर्वांनी सहकार्य केले आहे, यापुढेही ते कायम राहू द्या. यातूनच या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे, त्याचा फैलाव रोखणे शक्य आहे. या प्रादुर्भावाचा गुणाकार आपल्याला समाजात होऊ द्यायचा नाही. तर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून याची वजाबाकी करून त्याला हद्दपार करायचे आहे, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सर्वप्रथम आपल्याला या संकटावर मात करायची आहे. आज जनता कर्फ्यू आहे म्हणून बाहेर पडायचे नाही आणि उद्या कसेही वागायला, फिरायला मोकळे असा त्याचा अर्थ होत नाही. आपण अतिशय संवेदनशील स्थितीमध्ये पोहोचलो आहोत. गेल्या दोन दिवसात राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतांना दिसते आहे. ही संख्या कमी करण्यासोबत थांबवायची सुद्धा आहे. त्यासाठी आपल्याला गर्दीत जाणे टाळणे, गर्दी न करणे, घराच्या बाहेर आवश्यकता नसेल तर न पडणे यासारख्या गोष्टी करणे अत्यावश्यक आहे.

घरातल्या क्वारंटाईन व्यक्तींनी बाहेर फिरू नये

आजपर्यंत महाराष्ट्रात परदेशातून नागरिक, आपले कुटुंबिय आले आहेत. आता विमानसेवा बंद केल्याने परदेशातून आता कुणी आपल्याकडे येणार नाही. त्यामुळे आपल्याला संकटावर मात करण्याची, प्रादुर्भावाची ही साखळी तोडण्याची चांगली संधी आहे. विलगीकरण कक्षात असलेल्या नातेवाईकांची काळजी करण्याची गरज नाही, त्यांची काळजी शासन आणि महापालिका घेत आहे. परंतू परदेशातून ज्या व्यक्तींना घरात क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे त्यांनी घरात स्वत:ला क्वारंटाईन करून घेणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबियांपासूनही स्वत:ला दूर करण्याची गरज आहे. त्यांच्या हातावर शिक्के मारले आहेत. त्यांनी बाहेर समाजात किंवा घरातल्या लोकांमध्ये मिसळून प्रादुर्भाव वाढवू नये, किमान 15 दिवस बाहेर जाऊ नये, आपल्या प्रिय व्यक्तींपासून ही दूर रहावे. ज्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे त्यांनी काही लक्षणे आढल्यास डॉक्टरांना भेटावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यंत्रणेत काम करणारी ही माणसेच आहेत. याची जाणीव करून देताना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेवरचा ताण न वाढवण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. ही शांतता आणि संयम आपल्याला 31 तारखेपर्यंत ठेवायची आहे असेही त्यांनी सांगितले.

विषाणू जातपात पाहत नाही

आपण मंदिरे, धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे बंद केली. कारण हा विषाणू कोणत्याही प्रकारे जातपात, धर्म पहात नाही. कोणताही देश या संकटातून सुटला नाही.म्हणूनच आपण अनेक खाजगी कार्यालये, आस्थापना यांना कामगारांची, कर्मचाऱ्यांची उप‍स्थितीची संख्या कमी करायला सांगितली. वर्क फ्रॉम होम असे सांगितले. पण हाच कर्मचारी आणि कामगारवर्ग आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्यांना जपा, माणूसकी सोडू नका आणि त्यांचे किमान वेतन बंद करू नका, असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.