Municipal Encroachment Squad : नोटीस न देताच घरी जात महापालिका अतिक्रमण पथकातील अधिका-यांची दमदाटी, पोलिसांत तक्रार

एमपीसी न्यूज – इमारतीचा रॅम्प अनधिकृत असल्याबाबत कोणतीही नोटीस न देता महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम परवानगी पथकाचे (Municipal Encroachment Squad) अधिकारी राज्य राखीव सुरक्षा बलाच्या जवानांसह 70 जण घरात घुसले. दमदाटी केली. बांधकामाची कागदपत्रे ‘अ’ प्रभाग कार्यालयात आणून दाखवा. नाही आलात तर रॅम्प तोडून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप करत कोणाच्या तरी सांगण्यावरुन बेकायदेशीरपणे घरात घुसून अतिक्रमण विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांनी मानसिक त्रास, धमकावल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी निगडी प्राधिकरणातील ज्येष्ठ नागरिक प्रेमचंद गर्ग यांनी पोलिसांकडे केली आहे.

Bajirao Maharaj Bangar : पुण्यातील कीर्तनकर हभप बाजीराव महाराज यांचा अनोखा जागतिक विक्रम

 

याबाबत त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जात म्हटले आहे की, महापालिकेच्या अनधिकृत कारवाई पथकातील (Municipal Encroachment Squad) अधिकारी, कर्मचारी गुरुवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घरी आले. मला व माझ्या कुटुबियांना धमकावले. तुमच्या बिल्डींगचा रॅम्प अनधिकृत असल्याची तक्रार आली आहे. त्यांनी बिल्डींग बांधकामाबाबत परवनागी, सर्व कागदपत्रांची मागणी केली. रितसर सर्व कागदपत्रे असून आणतो असे मुलाने सांगितले. त्यावर बीट निरीक्षक स्वाती होसमानी यानी उद्या अ प्रभाग कार्यालयात येऊन कागदपत्रे दाखवा. जर तुम्ही नाही आलात तर मी सर्व तुमचा रॅम्प तोडून टाकेल, अशी धमकी दिली.

 

 

रॅम्प अनधिकृत असल्याबाबत महापालिकेने कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नाही. तक्रार दाखविण्याची विनंती केली असता ती दाखविली नाही. याउलट आमचे कोणतेही म्हणने ऐकून न घेता आम्हाला दमदाठी केली. रॅम्प काढून टाका नाही तर मी उद्या परत येईल व तोटून टाकेल. कोणतीही नोटीस न देता स्वाती होसमानी यांनी घरी येऊन मी आजारी असताना कुटुंबियांना धमकावले. मानसिक त्रास दिला. त्यामुळे कारवाई पथकातील स्वाती मॅडम, त्यांच्या सोबतच्या सर्व कर्मचा-यांची कसून चौकशी करावी. कोणाच्या तरी सांगण्यावरुन बेकायदेशीरपणे घरात घुसून मानसिक त्रास, धमकावल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी गर्ग यांनी तक्रार अर्जातून केली आहे.

कोणालाही धमकी दिली नाही – स्वाती होसमानी

याबाबत बोलताना बीट निरीक्षक स्वाती होसमानी म्हणाल्या, ” गुरुवारी अतिक्रमणची कारवाई झाल्यानंतर प्राप्त झालेल्या दोन तक्रारींबाबतची माहिती तत्काळ बघण्याचा आदेश आम्हाला होता. कारवाई चालू असताना टीम माझ्यासोबत होती. कारवाई झाल्यानंतर आम्ही घटनास्थळी गेलो. इमारतीच्या सुरक्षारक्षकाला तक्रारीबाबत सांगितले. अनेक वेळ वाट बघून कोणीच खाली आले नाही. आमच्या टीममधील दोघे वर घरात गेले. त्यानंतर ब-याचवेळांनी खाली आले. मंजूर प्लॅनमध्ये रॅम्प असेल तर त्याची कागदपत्रे दाखविण्याची आम्ही मागणी केली होती. रॅम्प अनधिकृत असेल तर आम्ही कारवाई करणार आहोत, असे सांगितले. तक्रारींवरुन प्राथमिक पाहणीसाठी आम्ही गेलो होतो. त्यामुळे नोटीस दिली नव्हती. कोणालाही धमकी दिली नाही. सगळे आरोप चुकीचे आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.