New Delhi : आधारकार्ड घटनात्मकदृष्ट्या वैध, मात्र आधारकार्ड देण्याची सक्ती करता येणार नाही !

एमपीसी न्यूज- आधार कार्ड हे घटनात्मकदृष्ट्या वैध असून आधारमुळे वैयक्तिक गोपनीयतेवर घाला येत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचप्रमाणे कोणतीही खासगी संस्था नागरिकांकडून आधारकार्ड मागू शकत नाही. किंवा आधारकार्ड देण्याची सक्ती करू शकत नाही असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे. ‘आधार’च्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, ‘आधार’च्या माध्यमातून नागरिकांवरती टेहळणी करणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे ‘आधार’च्या माध्यमातून नागरिकांच्या खासगीपणाच्या अधिकारावर गदा येईल तसेच त्यांच्यावर नजर ठेवता येईल हे आक्षेप चुकीचे आहेत. ‘आधार’ कार्ड सुरक्षित असून यामुळे गरीबांना बळ मिळाले आहे. ‘आधार’ कार्ड सर्वसामान्यांची ओळख असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निकाल देताना आधारकार्ड बाबत खालील महत्वाच्या बाबी नमूद केल्या आहेत.

# कोणत्याही खासगी कंपनीला आधारकार्ड मागता येणार नाही.

# सीबीएसई, नीट आणि यूजीसी परीक्षांसाठी आधारसक्ती नाही

# शाळा, कॉलेजमधील प्रवेशासाठी आधारसक्ती नाही.

# पॅनकार्ड लिंक करण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य

# सिमकार्डसाठी आधार कार्डची गरज नाही.

# घुसखोरांना आधारकार्ड मिळणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी

# बँक खात्याला आधार लिंक करण्याची गरज नाही

# आधार कार्ड नसेल तरीही कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.