New Delhi: भारतात तीन मेपर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ – नरेंद्र मोदी

एमपीसी न्यूज – कोरोना नियंत्रणासाठी तीन मेपर्यंत लॉक़डाऊनला मुदतवाढ देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत आज (मंगळवारी) संपणार होती. ती आता 19 दिवसांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या देशात सुरू असलेला लॉकडाऊन एकूण 40 दिवसांचा असणार आहे.

राष्ट्राला उद्देशून पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी संदेश दिला. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची मुदत वाढवली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. महाराष्ट्रासह काही राज्यांनी यापूर्वीच 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय घोषणा करतात, याकडे सर्व देशाचे लक्ष लागले होते.

काही भागांत ‘लॉकडाऊन’मध्ये सशर्त शिथिलता

देशातील परिस्थितीचे 20 एप्रिलपर्यंत बारकाईने निरीक्षण करून कोरोनाचा धोका नसलेल्या भागांमध्ये लॉक डाऊनमधून सशर्त काही सवलत दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. सवलत देण्यात येणाऱ्या भागात कोरोनाचे एक पाऊल दिसले तरी त्या भागातील अनुमती तातडीने रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र शासनाकडून लॉकडाऊनच्या संदर्भात लवकरच विस्तृत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

भारताने आतापर्यंत कोरोनाविरुद्धच्या लढाईत वेळोवेळी उचललेली महत्त्वाची पावले व घेतलेल्या निर्णयांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 100 पर्यंत पोहचली नाही तोपर्यंत आपण परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणाचा निर्णय घेतला. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 525 असताना आपण 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला. समस्या वाढण्याची वाट न पाहता समस्या दिसताच आपण तिला रोखण्यासाठी वेळीच प्रयत्न सुरू केले. कोणत्याही देशांशी आपली तुलना करणे चुकीचे आहे, मात्र सामर्थवान देशातील कोरोनाचे आकडे पाहिले तर भारतातील परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. महिना-दीड महिन्यापूर्वी कोरोना रुग्णांची संख्या भारताच्या बरोबर असणाऱ्या या देशांमध्ये आता भारताच्या 25 ते 30 पट कोरोनाचे रुग्ण झाले आहेत व हजारो रुग्णांचे मृत्यू झाले आहेत, याकडे मोदी यांनी देशवासीयांचे लक्ष वेधले.

लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंगचा मोठा फायदा

भारताने कोरोना विरुद्ध लढण्याची एकात्मिक योजना बनविली. भारताने निवडलेला मार्ग आपल्यासाठी योग्य ठरला. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचा फार मोठा फायदा भारताला झाला आहे. भारताने जलद निर्णय घेतले नसते तर भारताची काय स्थिती झाली असती, याची कल्पनाही करवत नाही. लॉकडाऊनमुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान होत असले तरी भारतीयांच्या जीवापुढे त्याची काही किंमत नाही. सर्व नागरिक, वैद्यकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा, प्रशासन यंत्रणा अशा सर्वांनीच जबाबदारीने काम केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली नाही, असे मोदी म्हणाले.

जगात अजूनही कोरोना पसरत आहे. भारताला ही कोरोनाविरुद्धची लढाई पुढे लढून जिंकायची आहे. देशाचे नुकसान कमी करायचे आहे. त्यासंदर्भात आम्ही राज्यांशी निरंतर चर्चा करत होतो. सर्वांकडूनच लॉकडाऊन वाढविण्याच्या सूचना आल्या. काही राज्यांनी तर त्याबाबत घोषणा देखील केल्या आहेत. देशातील अनेक मान्यवर व तज्ज्ञांनीही त्याच प्रकारच्या सूचना केल्यामुळे भारतातील लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले.

कोरोना विरुद्ध सप्तसूत्री

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी पंतप्रधानांनी देशवासीयांसाठी सप्तसूत्रीची घोषणा केली. या सप्तपदीचे प्रत्येक भारतीयाने पालन करावे, असे कळकळीचे आवाहन मोदी यांनी केले.

  1.  घरातील ज्येष्ठांकडे विशेष लक्ष द्या. जुने आजार असलेल्यांना ज्येष्ठांना कोरोनापासून वाचवावे.
  2. लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पाळा, घरात बनविलेल्या मास्कचा वापर करावा. 
  3. आयुष मंत्रालयाने कोरोनासंदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करा
  4. आरोग्य सेतू हे मोबाईल अॅप प्रत्येकाने डाऊनलोड करावे व इतरांनाही त्यासाठी प्रेरित करावे. 
  5. देशातील गोरगरीबांची शक्य तेवढी काळजी घ्या, कोणीही उपाशी राहणार नाही यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावे.
  6. विविध उद्योग-व्यवसाय चालविणाऱ्यांनी परिस्थिती प्रतिकूल असली तरी कामगारांविषयी सहवेदना बाळगावी. कोणालाही कामावरून कमी करू नये.
  7. डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी हे सर्व कोरोनाच्या लढाईतील योद्धे आहेत. त्यांच्या प्रत्येकाने योग्य सन्मान ठेवावा व गौरव करावा.

ही सप्तसूत्री हाच कोरानावर विजय प्राप्त करण्याचा मार्ग आहे. त्याचे पूर्ण निष्ठेने पालन करावे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करा आणि जिथे आहात, तिथे सुरक्षित राहा, असा संदेश देऊन मोदींनी भाषणाचा शेवट केला.

कोरोनाची लस शोधण्याचे आव्हान युवा शास्त्रज्ञांनी स्वीकारावे – मोदी

या जगाच्या व समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी कोरोनावर प्रभावी औषध व प्रतिबंधक लस शोधण्याचे आव्हान भारतातील युवा शास्त्रज्ञांनी स्वीकारावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कोरोनाला रोखण्यासाठी कडक उपाययोजना करीत असताना कोरोनाचा पूर्ण पराभव करण्यासाठी कोरोनावरील लस शोधणे अत्यंत गरजेचे आहे, असे ते म्हणाले. भारतात अनेक युवा प्रतिभावंत शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी हा विडा उचलावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.