New Delhi: चीनमधून आलेल्या रॅपिड टेस्ट किटचा वापर थांबवण्याचे ‘आयसीएमआर’चे आदेश

या व्यवहारात भारताचे एक रुपयाचेही नुकसान झाले नसल्याचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज – देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविड -19 च्या तपासणीसाठी चीनमधून आलेल्या रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किटचा वापर त्यांच्या अचूकतेची तपासणी होईपर्यंत थांबवावा, असे आदेश इंडियन कौंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अॅपेक्स बॉडीने दिले आहेत. या व्यवहारात भारताचे एक रुपयाचेही नुकसान झाले नसल्याचे स्पष्टीकरणही ‘आयसीएमआर’कडून करण्यात आले आहे.

दोन चिनी कंपन्यांकडून घेण्यात आलेले हे टेस्ट किट चुकीचे आहेत आणि चुकीचे निर्णय देत आहेत अशी तक्रार काही राज्यांकडून आय़सीएमआरकडे आली होती. त्यानंतर आय़सीएमआर याची शहानिशा करत असून त्याची गुणवत्ता तपासण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन याविषयी बोलताना म्हणाले की, या टेस्ट किटचे निकाल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे येत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून राहणे योग्य नाही. जागतिक आरोग्य संघटनेने देखील त्यांच्या अचूकतेविषयी काहीही भाष्य केले नाही. आयसीएमआरच्या या टेस्टकिटची तपासणी आपल्या दोन लॅबमध्ये करत असून नवीन आदेश येईपर्यंत यांचा वापर थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आरोग्य विभागाच्या अधिका-याने या विषयी बोलताना सांगितले की, आरोग्य मंत्रालयाची विविध राज्यांशी मिटींग झाली. त्यानंतर या टेस्ट किटची अचूकता तपासेपर्यंत तात्पुरता वापर थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर एका पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हणाले की, या टेस्ट किटच्या निकालामध्ये खूपच तफावत आढळून आली असून त्याचे प्रमाण ६ ते ७१ टक्के एवढे असल्याचे काही राज्यांकडून निदर्शनास आले आहे. जर हे टेस्ट किट दोषी असल्याचे सापडले तर ते कंपनीला परत घेण्यास सांगण्यात येईल.

भारताने नुकतेच दोन चिनी कंपन्यांकडून पाच लाख रॅपिड अँटी बॉडी टेस्ट किट घेतले असून ते कोविडचा जास्त धोका असलेल्या राज्यांना वितरित करण्यात आले आहेत.

सध्या सरकारमार्फत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी घसा आणि नाकाच्या स्वॅबची पॉलिमरेज चेन रिएक्शन (पीसीआर) तपासणी करण्यात येते. याचे निकाल कळण्यासाठी सुमारे पाच ते सहा तास लागतात. रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किटमध्ये संशयित व्यक्तीच्या रक्ताची चाचणी करण्यात येते, ज्याचा निकाल कळण्यासाठी फक्त पंधरा ते तीस मिनिटे एवढा कालावधी लागतो.

नफेखोरी करणाऱ्या कंपनीला न्यायालयाकडून चाप

चीनकडून भारताला 5 लाख रॅपिड टेस्ट किट हवे होते. आयसीएमआरनं त्यासाठी रेअर मेटाबॉलिक्स कंपनीकडे ऑर्डर दिली होती. चीनमधून आयातीचा परवाना असलेल्या मॅट्रिक्स लॅबला 245 रुपयाला एक किट मिळालं. पण त्यांनी रेअर मेटाबॉलिक्सकडे देताना त्याची किंमत 600 रुपये लावली आहे. म्हणजे सव्वा बारा कोटी रुपयांचा माल कंपनीनं 21 कोटी रुपयांना विकला आहे. काहीही न करता जवळपास नऊ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे.

कुठल्याही व्यवहारात कंपनी आर्थिक नफा बघतेच. पण इथे नफ्याची टक्केवारीही भयानक आहे. जवळपास 50 टक्क्यांपेक्षा अधिक नफा कंपनीनं काढला. दुसरी गोष्ट म्हणजे इतकं करुन जो माल आलाय तो देखील दर्जाहीनचं आहे. कारण या किटचे रिझल्ट चुकीचे येत असल्यानं दोन दिवस हे किट थांबवण्याचे आदेश आयसीएमआरला द्यावे लागले. त्यामुळे केवळ संकटाचा फायदा घेत नफेखोरी करणाऱ्या अशा कंपनीला धडा शिकवण्याची गरज आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या कंपनीच्या कारभारावरुन सडकून टीका केली आहे. आयातीच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या या कंपन्यांचं प्रकरण दिल्ली हायकोर्टातही गेलं. कोर्टाने या कंपनीच्या नफेखोरीला चाप लावला आहे. जास्तीत जास्त 245 रुपयांचं हे किट आता 400 रुपयांपेक्षा अधिक किंमतीला विकता येणार नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.