Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेसची शुक्रवारी शहर बंदची हाक

एमपीसी न्यूज – शिखर बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडीने) सुडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी (दि.27) पिंपरी- चिंचवड बंदची हाक दिली आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपला झंजावाती दौरे व जनसंपर्क करून नाकीनऊ आणले आहे.  त्यामुळे विधानसभेला शरद पवार साहेबांमुळे भाजपला धोका होऊ शकतो, हे समोर दिसू लागले आहे. त्यामुळेच ईडीने गुन्ह्यामध्ये पवार साहेबांचे नाव गोवण्यात आले आहे. उद्याच्या काळात भाजपच्या विरोधात कोणीही बोलूच नये व अन्यायाबाबतही बोलू नये अशी हुकूमशाही भाजपने चालवलेली आहे. तसेच सर्व सामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक भयभीत रहावा, हीच खेळी आहे. त्यामुळे अशा हुकूमशाहीचा आपण लोकशाही मार्गाने विरोध करत असून शुक्रवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील आय-टी, उद्योग, कारखाने, ऑटोमोबाईल सेक्टरच्या उभारणीत शरद पवार साहेबांचे योगदान महाराष्ट्राला माहित आहे. उद्याचा आपला महाराष्ट्र राहण्यासाठी पवार साहेबांचे पन्नास वर्षांचे योगदान विसरणे शक्य नाही. सर्वसामान्यांना सुद्धा अत्याचार व पोलिसांसारख्या यंत्रणांचा दबाव-हुकूमशाही प्रमाणे करतात हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी शहरातील सर्वसामान्य नागरिक, शाळा, व्यापारी, संस्था, उद्योजकांनी या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होऊन स्वत:च्या हक्कासाठीच्या या बंदमध्ये पाठिंबा देऊन सहभागी व्हावे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.