T20 World Cup 2021 : न्युझीलंड संघाने केला 8 गडी आणि 33 चेंडु राखून भारताचा दणदणीत पराभव

(विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : महत्वपूर्ण सामन्यात भारताचा न्युझीलंड संघाने केला आठ गडी आणि 33 चेंडु राखून दणदणीत पराभव. भारतीय संघाचे उपांत्यफेरीचे स्वप्न आता स्वप्नच राहील की काही चमत्कार होईल? करो या मरो अशी परिस्थिती असलेल्या दोन्ही संघाला केवळ आणि केवळ विजयाचीच गरज असलेल्या दोन संघातील महत्वपूर्ण सामन्याकडे तमाम क्रिकेटजगताच्या लक्ष लागून राहिले होते.

दुबईच्या मैदानावर झालेल्या आजच्या दुसऱ्या आणि सुपर 12 च्या ग्रुप बी मधल्या एकूण 28 व्या सामन्यात न्यूझीलंड कर्णधार केन विलीएम्सने नाणेफेक जिंकली आणि कोहलीचे व नाणेफेकीचे वाकडे आजही चालूच राहीले. आजच्या महत्वपूर्ण सामन्यासाठी भारतीय संघाने दोन बदल करत ईशान किशन व शार्दुल ठाकूरला अंतिम 11 संघात स्थान देताना भुवनेश्वर व सुर्यकुमारला बाहेर ठेवले.

सुपरहिट रोहीत शर्माला सलामीला न पाठवता ईशान किशनला  सलामीला बघून सर्वानाच धक्का बसला,यातून सावरण्याआधीच ईशान किशन केवळ चार धावा काढून आणि खराब फटका मारून ट्रेंट बोल्टची शिकार ठरला,तर त्यानंतर आलेल्या दुसऱ्याच चेंडूवर रोहीत शर्मा झेलबाद होता होता राहीला. आयपीएलमध्ये एकाच संघातुन खेळणाऱ्या बोल्टने आपल्या अनुभवाच्या जोरावर नवख्या किशनला फार सहज मामू बनवले.

किशनला यामुळे आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा फरक चांगलाच कळाला असेल. रोहीत शर्मालाही समजण्याआधीच तंबूचा रस्ता धरावा लागला असता पण त्याचा महत्वपूर्ण झेल ऍडम मिल्नेने सोडून एकप्रकारे भारताला मोठीच मदत केली. याचा फायदा उठवत रोहित आणि के एल राहुलने काही साहसी फटके मारून धावांची गती जरा वाढवली होतीच की के एल राहुल पहिल्या पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात टीम साऊदीच्या गोलंदाजीवर वैयक्तिक 18 धावा करून झेलबाद झाला. ज्यामुळे भारतीय संघांची अवस्था सहा षटकात दोन बाद 35 झाली होती. राहूलनेही तीच चूक केली जी नवख्या किशनने केली होती.

यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानावर आला. त्याला साथ देण्याऐवजी रोहीतने संघाच्या धावसंख्येत केवळ 5 धावांची भर घालून खराब फटका मारूनच सोधीला आपली विकेट बहाल केली. मिल्सने केलेली चूक मात्र गुप्टीलने केली नाही आणि एक सोपा झेल घेत ईश सोधीला बर्थडे गिफ्ट दिली. एरवी जबरदस्त खेळणाऱ्या कोहलीने कदाचित आपल्या सहकाऱ्याना बरोबर ठरवण्यासाठी की काय पण असाच एक खराब फटका मारून सोढीला 29 व्या वाढदिवशी कर्णाच्या थाटात आपली विकेट दान केली. यामुळे महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाचे लाजीरेवाने प्रदर्शन क्रिकेट चाहत्यांना दिसू लागले.

दहा षटकानंतर या खराब खेळामुळे भारतीय संघाची अवस्था चार बाद  48 अशी बिकट झाली होती.आता पुढे काय होईल आणि भारतीय संघ किमान लढण्याची मानसिकता तरी दाखवेल की नाही या आशंकेने क्रिकेटप्रेमीना छळायला सुरुवात केली.आणि ही फक्त शंका नाही तर खात्रीच आहे असे तेंव्हा वाटले जेंव्हा ऋषभ पंतही 19 चेंडूत 12 धावा काढून मिल्नेच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. आणि भारतीय संघाची अवस्था अधिकाधिक खराब होत गेली. एकालाही खेळपट्टीवर ना टिकावे वाटले ना संघाची अवस्था सुधारावी वाटली. अखेर जडेजाने काही साहसी फटके मारत संघाला 100 तरी गाठल्याचे समाधान दिले आणि निर्धारित 20 षटकात भारतीय सॉरी सॉरी बलाढ्य भारतीय संघ केवळ 110 धावाच जमवू शकला.

उत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडची पहिली विकेट जरी स्वस्तात गेली असली तरी दुसऱ्या गड्यासाठी  मात्र मिचेल आणि कर्णधार केनने समजदारीने फलंदाजी करून आधीच सोपे असलेले विजयी लक्ष आणखीनच सोपे केले. विजयाजवळ आल्यावर मिचेल वैयक्तिक 49 धावा करून बाद झाला असला तरी कर्णधार केन विल्लीमसने नाबाद राहत विजयी लक्ष्य सहज गाठून देत संघाल तब्बल आठ गडी आणि 33 चेंडू राखून मोठा विजय मिळवून दिला आणि भारतीय संघाचे उपांत्यफेरीचे लक्ष्य जास्तच अवघड केले.

कर्णधार केन विलीएम्सन 33 धावा करून नाबाद राहिला. भारताकडून फक्त बुमराह हा एकटाच विकेट्स घेऊ शकला.एकंदरीतच हा सामना न्यूझीलंडने जिंकला असे म्हणण्यापेक्षा भारतीय संघाने खराब खेळ करून गमावला असेच म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल,नाही का?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.