Ajit Pawar : पुणे, पिंपरीत आता ‘एकच वादा… अजितदादा!’

एमपीसी न्यूज (गोविंद घोळवे) – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांचे कारभारी (Ajit Pawar) आता चंद्रकांतदादा राहणार नसून लवकरच अजितदादा नवे कारभारी होणार असल्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एकच वादा… अजितदादा’ असा नारा ऐकण्यास मिळणार आहे. या आठवड्यातच अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती होणार आहे.

पुणे जिल्हा ग्रामीण आणि पुणे, पिंपरी-चिंचवड शहरावर भाजप आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आणण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांच्या ऐवजी अजितदादा पवार प्रभावी ठरणार असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आशीर्वादाने लवकरच अजितदादांकडे संपूर्ण जिल्ह्याचा कारभार सोपविण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार व दोन खासदार आहेत तर भाजपचे आठ आमदार व एक खासदार आहे. काँग्रेसचे केवळ तीन आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक खासदार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिंदे यांच्या शिवसेनेचा एकही आमदार नाही.

त्यामुळे भविष्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी ताकदवान युती होणार आहे. पुणे शहर वगळता सर्व ठिकाणी ‘दादा बोले प्रशासन चाले’ या उक्तीप्रमाणे पवारांच्या हातात सर्व सत्ता केंद्रे राहणार आहेत.

भाजपमध्ये पक्षश्रेष्ठींचा आदेश सर्वोच्च समजला जातो. त्यामुळे पक्षात अंतर्गत प्रचंड नाराजी असली (Ajit Pawar) तरी कोणाचीही उघड बोलण्याची हिंमत होत नसते. चंद्रकांतदादा पाटील हे अत्यंत सज्जन आणि संयमी नेते म्हणून ओळखले जातात, परंतु पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात भाजपला चंद्रकातदादांच्या ऐवजी अजितदादा फायदेशीर ठरत असल्याने सर्व सूत्रे त्यांच्याकडे सोपविली जाणार आहेत.


प्रशासनात मोठ्या फेरबदलांची शक्यता –

अजितदादा पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती होताच प्रशासनामध्ये प्रचंड खळबळ उडाली असून लवकरच पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे राहुल महिवाल, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्येही खांदेपालट होण्याची शक्यता आहे, कारण अजितदादांना अत्यंत कार्यक्षम अधिकारीवर्ग लागतो. त्यामुळे कोणाचा पत्ता कट होतो, याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.


पुणे महापालिकेवर पूर्वी चंद्रकांतदादा पाटील, खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे यांचा शब्द अंतिम मानला जात असे. तसेच स्थानिक पातळीवर माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेते गणेश बिडकर यांची प्रशासनावर चलती होती.

कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस शक्यतो छोट्या-मोठ्या प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करीत नसत. चंद्रकांतदादा मात्र पालकमंत्री या नात्याने बैठका, नियोजन पाहात होते, मात्र त्यांचा प्रशासनावर दबदबा नव्हता. त्यामुळेच भाजपचे राष्ट्रीय चाणक्य, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चंद्रकांतदादांच्या ऐवजी अजितदादांना प्रथम पसंती देऊन पुणे जिल्ह्याची सूत्रे त्यांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला असून लवकरच पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी अजितदादांची नियुक्ती होणार आहे.

पुणे जिल्ह्यात सध्या तरी अजितदादा पवार यांच्या एवढा प्रभावी नेता भाजपकडे नसल्याने आगामी सर्व निवडणुका (Ajit Pawar) अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नाममात्र जागा सोडण्यात येणार आहेत. भविष्यात ज्येष्ठ नेते शरद पवार आक्रमकपणे अजितदादांच्या विरोधात राजकारण करणार नसले तर पुणे, पिंपरीत ‘एकच वादा…अजितदादा’ हाच आवाज घुमणार आहे. त्याला भाजप श्रेष्ठींचा पाठिंबा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


पिंपरी पालिकेत तिसऱ्या दादांची एंट्री

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पूर्वी ‘एकच वादा… आमदार महेशदादा’ असा आवाज होता, कारण आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजारी होते तर चंद्रकांतदादा थोड्या प्रमाणात लक्ष देत असत, परंतु आता चंद्रकांतदादा, आमदार महेशदादा यांच्यानंतर पिंपरी महापालिकेत तिसरे अजितदादा यांची एन्ट्री होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आनंदी वातावरण दिसत आहे तर भाजप कार्यकर्त्यांमध्ये, ‘ये क्या हुआ, कैसा हुआ, कब हुआ और आगे क्या होगा…’ असा सूर आळविला जात आहे.


– गोविंद घोळवे
राजकीय सल्लागार संपादक
एमपीसी न्यूज

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.