Nigdi : भरधाव वेगातील कारची वडापावच्या हातगाडीला धडक; उकळते तेल सांडल्याने एकजण भाजला

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या कारने रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या वडापावच्या हातगाडीला धडक दिली. या अपघातात उकळते तेल सांडल्याने हातगाडी चालक गंभीररीत्या भाजला आहे. ही घटना आज, मंगळवारी (दि. ११) दुपारी तीनच्या सुमारास प्राधिकरण येथे घडली.

प्राधिकरण येथे कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेजवळ खूप वेळापासून काही तरुण भरधाव वेगात कार चालवत होते. वेगवान कारमुळे रस्ता ओलांडणे देखील नागरिकांना जमत नव्हते. शाळेच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला मुन्ना वडापाव आणि दाबेलीची एक हातगाडी लावलेली आहे. वारंवार रस्त्यावर चकरा मारल्यानंतर भरधाव वेगातील कारने वडापावच्या गाडीला धडक दिली.

मोठा ब्रेकचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक क्षणात जमा झाले. हातगाडीवर वडे तळण्याचे काम सुरु होते. त्यासाठी गॅसवर तेल उकळत होते. अचानक हातगाडीला धडक बसल्याने उकळते तेल हातगाडी चालकाच्या अंगावर सांडले. यामध्ये हातगाडी चालक गंभीररीत्या भाजला आहे. हातगाडीचे देखील नुकसान झाले आहे.

दरम्यान, नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर, निगडी पोलीस ठाण्यातील मार्शल घटनास्थळी दाखल झाले. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.