Nigdi: मावळसाठी पीएमपीएमएलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या निगडी आगारातून मावळ(Nigdi) तालुक्यातील तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा, नवलाख उंबरे या ठिकाणी पीएमपीएमएल बस वाहतूक केली जाते. मात्र सध्या सुरु असलेल्या फेऱ्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत असल्याने आणखी फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

मावळ तालुक्यातील विविध भागातील प्रवासी पीएमपीएमएल बसने प्रवास करतात. पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारी ही एक सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. लोहमार्गावर असलेल्या नागरिकांना लोकलची सुविधा आहे. मात्र त्याव्यतिरिक्त भागातील नागरिकांना पीएमपीएमएल सोयीची आहे.

Chakan : चाकणमध्ये विसर्जन मिरवणुकांचा जल्लोष

मावळ मधून लाखो नागरिक पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात वेगवेगळ्या (Nigdi) कारणांसाठी येत-जात असतात. यातील अनेक नागरिक पीएमपीएमएल बसने प्रवास करण्यास पसंती देतात. त्यामुळे या बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुट्टीच्या दिवशी देखील बसगाड्या गच्च भरलेल्या असतात.

मात्र दुपारच्या वेळी काही फेऱ्या कमी केल्या जातात. यामुळे निगडी येथील स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होते. एखादी बस आल्यास त्यात उभा राहण्यासाठी देखील जागा मिळत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएमएलच्या मावळमधील फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

प्रवासी महेश फुसे म्हणाले, “दुपारच्या वेळी बसगाड्या कमी असतात. दुपारच्या वेळेत लोकल सेवा ही बंद असल्याने बसने प्रवास करण्यासाठी प्रवाशांची गर्दी होते. वृद्ध नागरिक, लहान मुलांना चेंगराचेंगरीमधून प्रवास करणे जोखमीचे होते. त्यात बसमधील गर्दीमुळे चोरी होण्याची देखील शक्यता असते. मावळ मधून प्रवासी पीएमपीएमएलला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी फेऱ्या वाढवाव्यात.”

पीएमपीएमएलचे जनसंपर्क अधिकारी सतीश घाटे म्हणाले, “ठराविक मार्गावर बस फेऱ्या वाढविण्याबाबत मागणी झाल्यानंतर पीएमपीएमएल कडून त्या मार्गावरील प्रवाशांचा प्रतिसाद आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याचे सर्वेक्षण करण्यात येते. उपलब्ध मनुष्यबळ आणि बस गाड्यांची संख्या आदी बाबींचा विचार करून फेऱ्या वाढविण्याबाबत निर्णय घेतला जातो. पुढील काही दिवसात मावळ मधील मार्गाचे सर्वेक्षण करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.