Nigdi : अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रसंगावधान; घरात अडकलेल्या दीड वर्षीय चिमुकल्याची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज – घरात गॅस सुरु होता. गॅसवर दूध उकळत होते. दरम्यान, महिला भांडी आणण्यासाठी घराच्या बाहेर गेली आणि घराचा दरवाजा आतून बंद झाला. यामध्ये एक दीड वर्षाचा चिमुकला घरात अडकला. घरात अडकलेल्या चिमुकल्याची पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या प्राधिकरण उपकेंद्राच्या जवानांनी तात्काळ सुखरूप सुटका केली.

हंस अभिषेक कुमार (वय दीड वर्ष, रा. निरंजन हाऊस, प्राधिकरण निगडी) असे सुखरूप सुटका केलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

अभिषेक कुमार हे प्राधिकरणाच्या सेक्टर क्रमांक 24मध्ये निरंजन हाऊस सोसायटीत पहिल्या मजल्यावर राहतात. दुपारी हंस आणि त्याची आई घरात होते. सव्वाचारच्या सुमारास हंसची आई गॅसवर स्वयंपाक करीत होती. दोन्ही गॅस सुरु होते. गॅसच्या एका शेगडीवर भाजी शिजत होती. तर, दुस-या शेगडीवर दूध तापत होते. भाजी शिजण्यासाठी आणि दूध उकळण्यासाठी काही वेळ शिल्लक होता. त्यामुळे हंसची आई घराबाहेर ठेवलेली भांडी आणण्यासाठी गेली.

त्यावेळी हंस घरातच खेळत होता. आई बाहेर गेल्याचे हंसने बघितले आणि तो आईच्या मागे धावू लागला. पण, घराबाहेर जाण्याऐवजी त्याने दरवाजा पुढे ढकलला. दरवाजा अचानक बंद झाला आणि आतून कडी लागली गेली. हंस घरात आणि त्यांची आई बाहेर, गॅस सुरु, गॅसवर दूध उकळतंय, भाजी रटरटतेय आणि अचानक हंस रडू लागला. हंसच्या आईच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागला माहिती दिली.

प्राधिकरण अग्निशमन उपकेंद्राला घटनेची माहिती मिळाली. चीफ फायरमन शंकर पाटील, फायरमन विष्णू चव्हाण, फायरमन विलास कडू, वाहनचालक पद्माकर बोरावके यांच्या पथकाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. निरंजन हाऊस ही सोसायटी जुनी आहे. जुन्या सोसायट्यांना गॅलरी नाहीत, त्यामुळे जवानांचा गॅलरीतून जाण्याचा मार्ग बंद झाला. खिडकीतून जाण्याचा जवानांनी प्रयत्न केला. मात्र, खिडकीला आतल्या बाजूने भक्कम ग्रील असल्यामुळे तिथून देखील मदत मिळू शकत नव्हती.

सर्व बाजूंनी घर बंद झाले होते. दरवाजा तोडण्यापूर्वीचा शेवटचा पर्याय म्हणून जवानांनी ‘फायर एक्स’ नावाच्या उपकरणाने दरवाजाची आतल्या बाजूची कडी उचकली. काही वेळेत दरवाजा उघडला गेला. जवानांनी घरात धाव घेतली. दूध उकळले होते. उकळलेले दूध गॅसवर सांडून घरात धूर झाला होता. भाजी आटली होती. जवानांनी तात्काळ गॅस बंद केल्याने संभाव्य धोका टळला. हंसला सुखरूपपणे त्याच्या आईच्या स्वाधीन केले. दीड वर्षाचा हंस आईच्या कुशीत जाताच आनंदाने पुन्हा खेळू लागला. अग्निशमन जवानांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा हंसच्या चेह-यावर हसू फुटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.