Nigdi: पाच वर्षे ‘मन की बात’ नव्हे ‘धन की बात’- छत्रपती उदयनराजे भोसले

भाजपने केसाने गळा कापला

एमपीसी न्यूज –   गेल्या पाच वर्षात देश बिकट अवस्थेत आहे. सत्तेत येताच जनतेला दिलेल्या आश्वासनाचा भाजपला विसर पडला. तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली.  15 लाख खात्यात आले नाहीत. दोन कोटी रोजगार मिळाले नाहीत. केवळ पाच वर्षे मन की बात केली. पण यांच्या मनात विकास करण्याचे नव्हतेच. म्हणत होते मन की बात पण मनात होती खरी धन की बात असे सांगत छत्रपती खासदार उदयनराजे महाराज भोसले यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच झोपीतून उटल्यासारखे नोटबंदी, जीएसटीचा निर्णय घेतला, असा आरोप करत परिवर्तन करण्याचे आवाहन जनतेला केले. 

मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय डेमोक्रॅटिक – कवाडे, गवई, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, दलित पँथर व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ आज (शनिवारी)निगडी, प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवासाच्या मैदानावार आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी   माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, अपर्णा डोके  यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.

  • उदयनराजे म्हणाले, देशातील जनतेने भाजपला एकहाती सत्ता दिली. अभिनय करत जनतेच्या अंतरआतम्याला हात घातला. एवढा अभिनय मी कधीच बघितला नव्हता.  देशाची बिकट अवस्था केली आहे. लोकांमुळे आम्ही आहोत. याची आम्हाला जाणीव आहे. भाजप-शिवसेनेला केवळ मते हवी आहेत. ते म्हणतात आमच्यामुळे समाज आहे. भाजप-शिवसेना स्वार्थपोटी एकत्र आले आहेत. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.

पाच वर्षांत देश विकला आहे. देश आर्थिक दिवाळखोरीत आहे. 15 लाख खात्यात टाकले नाहीत. दोन कोटी रोजगार मिळाले नाहीत. दोन्ही गोष्टी करणे शक्य आहे. उदयनराजे करून दाखविणार आहे.

ज्यांच्या जीवावर मोठे झाले. ते त्यांना विसरले. पाया सोडून गेले. त्यांना माफ करू नका. त्यांना त्यांची जागा दाखवा, असेही उदयनराजे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.