Nigdi News: नवीन नकाशामध्ये 200 मीटरने रेडझोनची हद्द कमी झाली; भाजप नगरसेवकाचा दावा

In the new map, the red zone was reduced by 200 meters; BJP corporator claims

एमपीसी न्यूज – मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या मोजणीत ‘पीसीएनटीडीए’च्या चुकीमुळे रेडझोनची 200 मीटरने वाढलेली हद्द कमी झाल्याचा दावा भाजप नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केला आहे. यामुळे यमुनानगरमधील दीड हजार घरांना रेडझोन मधून दिलासा मिळणार असल्याचाही त्यांचा दावा आहे. प्राधिकरणाने नवीन नकाशाची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

याबाबत उत्तम केंदळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या चुकीच्या प्रस्तावामुळे 200 मीटरने रेडझोनची हद्द वाढली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशाने रेडझोन हद्दीची मोजणी पूर्ण करुन जिल्हाधिकारी कार्यालयाने नवीन हद्दीचा नकाशा प्रसिद्ध केला आहे.

त्यात रेडझोनची हद्द कमी झाली असून त्याचा निगडी, यमुनानगरमधील सुमारे दीड ते दोन हजार भूखंडधारकांना फायदा मिळणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाने या नकाशाची तातडीने अंमलबजावणी करावी.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दोन हजार यार्डनुसार रेडझोनच्या हद्द निश्चित केलेला नकाशा (गुगल/पी-स्केच) जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केला. या गुगल/पी-स्केच नकाशामध्ये रेडझोन नसताना प्राधिकरण सभेच्या चुकीच्या ठरावांमुळे रेडझोनची हद्द 200 मीटरने वाढीव झाली होती.

त्याचा फटका यमुनानगर, निगडी भागातील दीड-दोन हजार भूंखडधारकांना बसला. त्यांचे हस्तांतरण, बांधकाम परवानगी, ना-हरकत दाखले, कर्ज प्रकरणे इत्यादी कामांना स्थगिती मिळाली.

निगडी सेक्टर 22 येथील गृह प्रकल्पाबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने रेडझोन हद्दीच्या फेरमोजणीचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नगरभुमापन विभागाकडून ही मोजणी पूर्ण झाली.

या मोजणीचा नकाशा प्रसिध्द करण्यात आला. त्या नकाशामध्ये प्राधिकरणाच्या चुकीच्या ठरावामुळे रेडझोनची 200 मीटरने वाढलेली हद्द कमी झाल्याचा दावा केंदळे यांचा आहे. यामुळे रेडझोन बाधित दीड ते दोन हजार भूखंडधारकांना दिलासा मिळणार आहे.

उच्च न्यायालय व जिल्हाधिकारी पुणे यांनी प्रसिध्द केलेल्या रेडझोन नकाशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.