Nigdi News: मोदी सरकारचे खासगीकरणाचे धोरण राज्याचे आघाडी सरकार राबवतेय – डॉ. सुरेश बेरी

एमपीसी न्यूज – राज्यातले महाविकास आघाडीचे सरकार एकीकडे केंद्रातील मोदी सरकारला विरोध करते. तर, दुसरीकडे मोदी सरकारचे खासगीकरणाची धोरणे राज्यात राबवित असल्याचा आरोप लोकजागर ग्रुपचे प्रमुख कार्यकर्ते डॉ. सुरेश बेरी यांनी केला.

‘एसटी वाचवा संघर्ष समिती’च्या वतीने निगडी येथे एसटी कामगारांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी 2 जानेवारी रोजी एक कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती.’ त्यामध्ये डॉ.बेरी बोलत होते. ते पुढे म्हणाले, “केंद्र सरकारने कवडीमोल किंमतीत सार्वजनिक उद्योग विक्रीला काढले आहेत. गेल्या 70 वर्षात ज्या उद्योगांच्या उभारणीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला होता, ते आता मोदी सरकाने विकून टाकण्याचा सपाटा चालवला आहे. फायद्यातले उद्योग सुध्दा विकले जात आहेत. तेच धोरण राबवत राज्यातले महाविकास आघाडीचे सरकार एसटीचे खासगीकरण करण्याच्या बेतात आहे”.

”केंद्र सरकारने कामगारांच्या हिताचे पूर्वीचे 40 कायदे रद्द करून त्याच्या जागी कामगार विरोधी आणि उद्योगपतीधार्जिणे असे 4 कायदे आणले आहेत. तेच कायदे आता राज्य सरकारने राज्यात राबवायचे ठरवले आहे. अशा प्रकारे आघाडीचा भाजपविरोध फक्त राज्यातल्या सत्तेसाठी आहे. एसटीच्या खाजगीकरणामुळे संपूर्ण राज्यातले जनजीवन विस्कळीत होणार आहे. खेडोपाड्याच्या अर्थकारणावर त्याचा परिणाम होणार आहे. पण, त्याची सरकारला फिकिर नाही. सरकारला फक्त खासगी कंत्राटदारांची काळजी आहे. सरकारचा हा खासगीकरणाचा डाव एस टी कामगार आणि जनता यांनी हाणून पाडला पाहिजे” असेही डॉ. बेरी म्हणाले.

सूत्रसंचालन डीवायएफआयचे प्रमुख कार्यकर्ते सचिन देसाई यांनी केले. याप्रसंगी डीवायएफआयचे स्वप्निल जेवळे, बाळासाहेब घस्ते, रमेश लाटकर, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सुधीर मुरूडकर, श्रीराम नलावडे, लोकजागर ग्रुपचे गोकुळ बंगाळ, संकेत भरमगुडे, एसटी कामगार योगेश शिंदे, भरत नाईक, संदीप सिरसाठ, रहमान शेख, शाम भागवत, नगरकर उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला व नंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.