Nigdi News : देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उतरला अर्ध्यावर; गानसम्राज्ञीला अभिवादन

एमपीसी न्यूज – देशातील सर्वात उंच असलेला निगडी भक्ती शक्ती शिल्प समूहाजवळील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. भारतरत्न, गानसम्राज्ञी, गानकोकिळा असलेल्या लता मंगेशकर यांचे रविवारी (दि. 6) सकाळी मुंबईत निधन झाले. त्यामुळे देशात दुखावटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रध्वज देखील अर्ध्यापर्यंत खाली उतरवण्यात आला आहे.

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने मागील 28 दिवसांपूर्वी मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांना न्यूमोनियाचे देखील निदान झाले. त्यात त्यांची प्रकृती खालावली आणि वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या निधनामुळे देशभर दुखावटा जाहीर करण्यात आला आहे.

राज्य शासनाने देखील सोमवारी (दि. 7) एक दिवस दुखवटा जाहीर केला असून सोमवारी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे कला विश्वाची मोठी हानी झाली आहे. कला क्षेत्रासह विविध क्षेत्रातून याबाबत दुःख व्यक्त केले जात आहे.

पिंपरी पालिकेच्या वतीने निगडीत भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यानालगत 107 मीटर उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. निगडीतील हा झेंडा देशातील सर्वात उंच तिरंगा झेंडा असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज अर्ध्यापर्यंत खाली उतरवत संपूर्ण देशाने लता मंगेशकर यांना आदरांजली अर्पण केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.