Nigdi : निगडी पोलिसांनी वाहने आणि मोबाईलसह 16 किलो गांजा पकडला; सोळा लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – निगडी पोलिसांनी 36 मोबाईल, नऊ दुचाकी, एक ट्रक आणि 16 किलो गांजा असा एकूण सहा प्रकरणांमध्ये 15 लाख 95 हजार 460 रुपयांचा ऐवज जप्त केला. त्याचबरोबर तडीपार केलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात देखील निगडी पोलिसांना यश आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 24) रात्री आकुर्डी परिसरात गस्त घालत असताना पोलीस शिपाई अमोल साळुंखे भूपेंद्र चौधरी यांना एका मोटारसायकल वरून तीनजण जाताना दिसले. त्यांनी दुचाकीस्वारांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहून तिघेजण पळून जाऊ लागले. पोलिसांनी शिताफीने तिघांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ दोन चाकू आढळून आले. यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यामध्ये आढळून आले की, तिघांनी मिळून पिंपरी, चिंचवड, निगडी, चिखली, भोसरी या परिसरात मोबाईल आणि वाहन चोरी केली आहे. तिघांकडून 28 मोबाईल, दोन दुचाकी आणि चाकू असा एकूण 4 लाख 48 हजार दहा रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून अभिषेक लक्ष्‍मण भोसले (वय 19) आणि विशाल ऊर्फ जंगल्या हिरालाल लष्करे (वय 20, दोघे रा. काळेवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या प्रकरणात – मोहम्मद खलील गुलामहसन (वय 21, रा. निगडी, मूळ रा. जम्मू काश्मीर) यांच्या घरातून रोजी त्यांचा व त्यांच्या मित्रांचे मिळून सहा मोबाईल फोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याचा तपास करत असताना पोलीस नाईक सतीश ढोले यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यात चोरी झालेला मोबाईल फोन अजय अनिल साबळे (वय 20, रा. अजंठानगर, चिंचवड) हा वापरत आहे. पोलिसांनी सापळा रचून अजय याला रोजी अटक केली. त्याने त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा केल्याचे सांगितले. दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन तिघांकडून 68 हजार रुपये किमतीचे 8 मोबाईल फोन जप्त केले.

तिसऱ्या प्रकरणात – पोलीस नाईक रमेश मावसकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरणारी तीन अल्पवयीन मुले भक्ती शक्ती चौकात येणार आहेत. निगडी पोलिसांनी भक्ती शक्ती परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1 लाख 34 हजार रुपये किमतीच्या 6 मोटारसायकल जप्त केल्या.

चौथ्या प्रकरणात – नारायण गुणाजी तांबवे (वय 55, रा. निगडी) यांनी 9 जुलै रोजी त्यांचा 6 लाख रुपये किमतीचा डंपर चोरी झाल्याची तक्रार दिली. त्यांच्या ट्रकला असलेल्या जीपीएस डिव्हाईसद्वारे तांत्रिक तपास करून पोलीस हवालदार किशोर पढेर आणि विलास केकाण यांनी सांगली मधील नरसोबाचीवाडी येथे जाऊन दोघांना अटक केली. विजय मारुती शिंदे (वय 35, रा. पोखरी, आष्टी, जि. बीड), सोमनाथ लक्ष्मण पंदीखोडे (वय 28, रा. आरबुजवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पाचव्या प्रकरणात –  पोलीस हवालदार किशोर पढेर आणि विलास केकाण यांना माहिती मिळाली की, ओटास्कीम येथे एकजण गांजा विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार परिसरात सापळा रचून मंटू चंद्रभूषण पासवान (वय 46, रा. आझाद चौक, निगडी) याला अटक केली. त्याच्याकडून 16 किलो 300 ग्रॅम वजनाचा 3 लाख 45 हजार 450 रुपये किमतीचा गांजा जप्त केला. मंटू याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

सहाव्या प्रकरणात निगडी पोलिसांनी तडीपार केलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. दीपक शहाजी रिठे (वय 22, रा. ओटास्कीम, निगडी), सोमनाथ हनुमंत लष्करे (वय 22, रा. ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दीपक याला फेब्रुवारी 2019 मध्ये तर सोमनाथ याला जानेवारी 2019 मध्ये दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. ते तडीपारीच्या कालावधीत जिल्ह्याच्या हद्दीत मिळून आल्याने त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

वरील सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी 36 मोबाईल फोन, 9 दुचाकी, एक ट्रक, 16 किलो गांजा पकडला आहे. तसेच दोन तडीपार केलेल्या आरोपींना अटक केली आहे. या कामगिरीमुळे विविध पोलीस ठाण्यातील 13 गुन्ह्यांची उकल झाली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, सतीश ढोले, विलास केकाण, रमेश मावसकर, विनोद व्होनमाने, विजय बोडके, राहुल मिसाळ, तुषार गेंगजे, प्रवीण मुळूक, सोमनाथ दिवटे, मितेश यादव, अमोल साळुंके, भुपेंद्र चौधरी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.