Notary News : राज्यात 14 हजार 648 नोटरींची नियुक्ती

एमपीसी न्यूज – केंद्रीय विधी विभागाने (Notary News ) महाराष्ट्र राज्यात 14 हजार 648 नवीन नोटरींची नियुक्ती केली आहे. पुढील काही दिवसात पात्र वकील उमेदवारांना नोटरी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मागील वर्षी नोटरी वकिलांच्या नियुक्तीबाबत विधी विभागाने अर्ज मागवले होते.

महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड अतिश लांडगे, ॲड. सय्यद सिकंदर अली, ॲड रामराजे भोसले, ॲड विनयकुमार दुबे व पदाधिकारी यांनी कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची भेट घेऊन महाराष्ट्रतील नोटरी यांची संख्या वाढवून लवकर यादी जाहीर करण्याची मागणी केलेली होती. नोटरीच्या नियुक्तीनंतर असोसिएशनने केलेल्या मागणीला यश आल्याचे म्हटले जात आहे.

महाराष्ट्र राज्यासाठी केंद्रीय नोटरी म्हणून नियुक्तीसाठी 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर त्या अर्जदारांच्या 17 एप्रिल ते 4 मे 2023 या कालावधीत मुलाखती झाल्या. अर्ज केलेल्या वकिलांपैकी पहिल्या फेरीत (Notary News) ज्यांना मुलाखतीसाठी उपस्थित राहता आले नाही, अशा वकिलांसाठी 6 आणि 7 मार्च 2024 रोजी दुसरी फेरी घेण्यात आली.

Chinchwad : सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड अतिश लांडगे म्हणाले, “मुलाखती पार पडल्यानंतर पात्र उमेदवारांची नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पात्र वकील उमेदवारांना नोटरीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी आम्ही असोसिएशनच्या माध्यमातून केंद्रीय स्तरावर प्रयत्न करत होतो. त्याला यश आले आहे.”

नोटरी वकिलांना न्यायालयाच्या आवारात बसण्यासाठी स्वतंत्र जागा मिळावी. यामुळे गरीब आणि गरजू नागरिकांना याचा फायदा होईल, अशी मागणी शासनाकडे केली असल्याचेही लांडगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.