PCMC: सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार कर संकलन कार्यालये

एमपीसी न्यूज – कर संकलन व कर आकारणी विभागाच्या (PCMC) वतीने कर वसुलीचे 1 हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. आता नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही कर भरता यावा, यासाठी 31 मार्चपर्यंत कर संकलन कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी 17 विभागीय कार्यालये आणि ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत 840 कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. 1 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, वर्तमान पत्रात नावे प्रसिद्ध करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, जप्त मालमत्तांचा लिलाव करणे, यासारख्या कठोर कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळेच सध्यस्थितीत साधारण दररोज 5 कोटी रुपयांचा कराचा भरणा होऊ लागला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

नागरिकांना कर भरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने विशेष खबरदारी घेतली जात आहे. शनिवार आणि रविवार महापालिकेला सुट्टी असली तरी 31 मार्चपर्यंत या दोन्ही दिवशी कर संकलन (PCMC) कार्यालये सुरुच ठेवण्यात येणार आहेत.

‘या’ सणादिवशी कर संकलन कार्यालये सुरुच राहणार

दि. 25 मार्चला धुलीवंदन आणि दि.29 मार्चला गुड फ्रायडेची महापालिकेला शासकीय सुट्टी आहे. मात्र, या दोन्ही दिवशी नागरिकांच्या सोयीसाठी कर संकलन कार्यालये सुरू राहणार आहेत.

असे असणार वेळेचे नियोजन

नागरिकांच्या सोयीसाठी कर भरण्यासाठी वेळ वाढविण्यात आली आहे. आज शुक्रवार (दि.15) पासून दि. 24 मार्चपर्यंत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कॅश काऊंटर सुरू ठेवण्यात येणार आहेत. तर दि. 25 ते दि. 31 मार्चपर्यंत सकाळी 9.45 ते रात्री 8 वाजेपर्यंत कॅश काऊंटरवर मालमत्ता कराचा भरणा स्विकारला जाणार आहे, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.