Wimbledon : नोव्हाक जोकोव्हिचने जिंकले सहावे विम्बल्डन ; फेडरर, नदाल यांच्या विक्रमाशी बरोबरी

एमपीसी न्यूज – सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने विम्बल्डन 2021 स्पर्धेचे विजेतेपद खिशात टाकले आहे. काही दिवसांपूर्वी फ्रेंच ओपन पटकावणाऱ्या जोकोव्हिचने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत इटलीच्या नवख्या माटिओ बेरेट्टिनीचा 6-7, 6-4, 6-4, 6-3 असा पराभव केला. जोकोव्हिचचे हे सहावे विम्बल्डन आणि 20वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. यासह त्याने सर्वाधिक ग्रँडस्लॅम पटकावणाऱ्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

तब्बल साडेतीन तास रंगलेल्या पुरुष एकेरीच्या या सामन्यात माटिओ बेरेट्टिनीने पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिचला हैराण केले. दमदार आणि वेगवान सर्व्हिसेसमुळे बेरेट्टिनीने पहिला सेट आपल्या नावावर केला. त्यानंतर पुढच्या तीन सेटमध्ये जोकोव्हिचने आपला अनुभव पणाला लावत बेरेट्टिनीला मागे ढकलले. शेवटच्या सेटमध्येही बेरेट्टिनीने आपल्या वेगवान सर्व्हिसेसचा धडाका सुरूच ठेवला. काहीसे आक्रमक आणि ड्रॉप शॉटच्या जोरावर जोकोव्हिचने ही लढत आपल्या नावावर केली.

नोव्हाक जोकोव्हिचने यापूर्वी 2011, 2014, 2015, 2018, 2019, 2021 मध्ये विम्बल्डन स्पर्धेवर आपलं नाव कोरले आहे. ऑल इंग्लंड क्लबमध्ये सातव्या फायनलमध्ये पोहोचलेला जोकोविच 30 ग्रँड स्लॅम फायनलमध्ये पोहोचलेला रॉजर फेडररनंतरचा दुसरा पुरुष खेळाडू आहे. फेडररने 31 वेळा ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. एवढेच नव्हे तर नोवाक जोकोविचकडे नदाल आणि फेडररला मागे टाकण्याची देखील संधी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.