Pune Crime News : महावितरण अधिकाऱ्याला धक्काबुक्की, वाहनासकट जाळण्याची धमकी ; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वीजबिलांच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही अनधिकृत वीज वापरणाऱ्या थकबाकीदाराने महावितरणच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की व वाहनावर दगडफेक करून वाहनासकट जाळण्याची धमकी दिली. याप्रकरणी थकबाकीदार आरोपीविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय लक्ष्मण पडवळ असे या आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, मंचर उपविभाग अंतर्गत लोणी (ता. आंबेगाव) येथील संजय लक्ष्मण पडवळ या ग्राहकाचा वीजपुरवठा 9 हजार 690 रुपयांच्या थकबाकीमुळे 2019 मध्ये महावितरणकडून कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे. तरीही एका सर्व्हिस वायरद्वारे अनधिकृत वीजवापर सुरु असल्याची बाब महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जयंत गेटमे व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. 19) केलेल्या तपासणीमध्ये निदर्शनास आली व पुढील कारवाईमध्ये हा अनधिकृत वीजवापर तत्काळ खंडित करून सर्व्हिस वायर ताब्यात घेण्यात आली.

त्यानंतर दुपारी उपकार्यकारी अभियंता गेटमे हे कार्यालयीन वाहनाने व इतर सहा कर्मचारी आपापल्या वाहनाने लोणी परिसरात सरकारी कर्तव्य बजावत असताना आरोपी संजय पडवळ याने बोलेरो जीप रस्त्यावर आडवी लावून गेटमे यांना अडविले.

वीजपुरवठा का खंडित केला म्हणून शिवीगाळ, धक्काबुक्की केली. वाहनासकट जाळून टाकण्याची धमकी दिली व दगडफेक केली. यात वाहनाची समोरील काच फुटली. आरोपीने महावितरणच्या इतर कर्मचाऱ्यांना देखील शिवीगाळ करीत कार्यालयीन कागदपत्रे फाडून टाकले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.