Online Education: सोमाटणे येथील दोन तंत्रस्नेही शिक्षकांनी उचलला ऑनलाइन शिक्षणाचा विडा

दोघांनाही मिळून आतापर्यंत 150 ते 200 व्हिडीओ तयार केले आहेत. ते व्हिडिओ त्यांच्या learn from home या चॅनेलवर हजारो विद्यार्थी लॉकडाऊन आणि अनलॉकच्या काळात घर बसल्या पाहून त्याचा अभ्यास करतात.

एमपीसीन्यूज – सोमाटणे येथील रहिवासी असलेले सुरेश सुतार आणि लक्ष्मीकांत मुंडे यांनी ऑनलाइन शिक्षणाचा विडा उचलला आहे. गेल्या 5 महिन्यांपासून ते नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देत आहेत. त्यांच्या या प्रयोगाला अफलातून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या ध्येय वेड्या शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुरेश सुतार हे सोमाटणे येथील तुळजाभवानी विद्यालयात तर लक्ष्मीकांत मुंडे हे ग्रामप्रबोधिनी विद्यालय, साळुंब्रे येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 20 मार्चला कोरोना संसर्ग वाढू लागल्याने देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे सर्व शाळा, कॉलेज, दुकाने, बाजारपेठा यांसह सर्व व्यवहार ठप्प झाले. सर्वत्र कडकडीत लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु झाली.

सर्व शाळा बंद झाल्याने शिक्षणाची अडचण भासू लागली तसेच पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता स्वस्थ बसू देत नव्हती. आठवडा झाला, पंधरवडा उलटला. मात्र, लॉकडाऊन संपण्याची चिन्हे दिसत नव्हती.

या पार्श्वभूमीवर सुरेश सुतार आणि लक्ष्मीकांत मुंढे यांनी ऑनलाइन का होईना पण शाळा भरवायची असा चंगच बांधला. पहिल्यांदा सुतार यांच्या घरी ही ऑनलाइन शाळा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. या दोघांनी पुण्यातील नामवंत शिक्षण संस्था आयसर येथून प्रशिक्षण घेतल्याने त्यांना काहीच अवघड वाटले नाही.

याच कल्पनेतून त्यांनी एक यु ट्यूब चॅनेल काढले आणि आज त्यांच्या ऑनलाइन शाळेत राज्यभरातून दररोज सुमारे 400 ते 500 विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित राहतात.

याविषयी अधिक माहिती देताना सुरेश सुतार म्हणाले, आमच्या चॅनेलला ‘Learn from home’ हेच नाव दिले आहे. आम्ही हे चॅनेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू. शाळा बंद जरी असली तरी शिक्षण मात्र सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सुतार आणि मुंडे या दोघांनाही संगणकावर पीपीटी तयार करुन त्या आधारे वर्गात शिकविण्याचा छंद गेल्या 10 ते 15 वर्षांपासून होता.

या छंदाचा वापर करून या दोन्ही शिक्षकांनी पीपीटी तयार केल्या आणि याद्वारे ते ऑनलाइन वर्ग घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थी या वर्गात रमतात, असे मुंडे यांनी सांगितले.

या पद्धतीने आम्ही लॉकडाउन सुरू झाल्यापासून एकही दिवस खंड पडू न देता दररोज सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही दोघेही जण गणित भाग 1 व 2, इयत्ता 9 वी व इयत्ता 10 वी या दोन्ही वर्गाचे ऑनलाइन वर्ग घेत आहोत.

यात आणखी भर म्हणजे गेल्या काही दिवसांपासून या शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकानांही प्रशिक्षण देऊन पीपीटी कसे बनवायचे आणि ते ऑनलाइन कसे करायचे याचेही इथ्यंभूत प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे आता काही शिक्षक सुद्धा ऑनलाइन शिकवणीसाठी तयार झाले आहेत, ही फार महत्वाची बाब आहे.

या शिक्षक जोडीने लॉकडाउनमध्ये अनके शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीने वर्ग घेण्यासाठी व्हिडीओ तयार करण्यास मदत केली. तसेच त्यांचे सुद्धा आम्ही मार्गदर्शन घेतले. आपल्याकडे असणारे ज्ञान आणि कौशल्य हे इतरापर्यंत कसे देता येईल हाच या मागचा उद्देश होता, असे सुतार आणि मुंडे यांनी सांगितले.

सध्या हे दोघेही अहोरात्र मेहनत करून दिवसभर एखाद्या प्रकरणावर पीपीटी बनवतात व त्या आधारे संध्याकाळी ऑनलाइन लेक्चर घेतात.

दोघांनाही मिळून आतापर्यंत 150 ते 200 व्हिडीओ तयार केले आहेत. ते व्हिडिओ त्यांच्या learn from home या चॅनेलवर हजारो विद्यार्थी लॉकडाऊन आणि अनलॉकच्या काळात घर बसल्या पाहून त्याचा अभ्यास करतात.

लॉकडाऊन काळात तंत्रस्नेही होण्याची चांगली संधी मिळाली. सध्या शाळा बंद आहेत, पण मुलांचे शिक्षण चालू आहे, याचे समाधान असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

ही संकल्पना आम्ही चांगल्या पद्धतीने राबवत आहोत. आता सध्या आमच्या या उपक्रमातून प्रत्येक विषयाची तीन ते चार प्रकरणे पूर्ण होत आहेत.

आम्ही घर बसल्या शाळा बंद असल्याची उणीव भरून काढण्याचा मनस्वी प्रयत्न करतोय याचे समाधान शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. यातून या दोन्ही शिक्षकांचे शिक्षणावरील प्रेम आणि आस्था लक्षात येते.

जर जगभरात असेच तंत्रस्नेही शिक्षक तयार झाले तर हा बंद कितीही दिवस राहिला आणि शाळा जरी बंद राहिल्या तरी शिक्षण बंद राहणार नाही हे यानिमित्ताने समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.