Pimpri: पालिका मुख्यालय भाजपचे कार्यालय अन्‌ आयुक्त भाजपचे कार्यकारी अध्यक्ष – सचिन साठे

सरकट शास्तीकर माफ करा... अन्यथा जनता सरसकट हकालपट्टी करेल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात नगरसेवकांच्या नावे अनेक अनधिकृत फलक लागले असताना शहरवासियांच्या संवेदनशील प्रश्वांवर चालविलेल्या लढ्याचा फलक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे. काऊंटडाऊनचा फलक काढण्यास आयुक्तांनी पहिले प्राधान्य दिले. याचाच अर्थ आयुक्त हे भाजप शहराचे कार्यकारी अध्यक्ष असल्याचे सिद्ध झाले. तर, महापालिकेतून सध्या सुरु असलेला कारभार पाहता महापालिकेची इमारत हे भाजपचे मुख्य कार्यालय झाले आहे, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली. भाजपने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकट शास्तीकर माफ करावा… अन्यथा निवडणुकीत सरसकट हकालपट्टी करेल, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती 15 दिवसात घालवू या..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वसानाचे ‘काऊंट डाऊन’ करण्यासाठी विरोधक, सामाजिक संघटनांनी महापालिका भवनासमोर लावलेला फलक सोमवारी (दि.21) काढण्यात आला. त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज (मंगळवारी) विरोधकांनी महापालिका मुख्यालयाच्या आऊट गेटच्या समोर निषेध सभा घेतली. या सभेत साठे बोलत होते.

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, मनसेचे सचिन चिखले, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, वर्षा जगताप, समाजवादीचे रफिक कुरेशी, हरिष मोरे, प्रकाश जाधव, वैभव जाधव, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर आदी सहभागी झाले होते. त्यानंतर काऊंटडाऊनचा पुन्हा फलक लावला आहे.

यावेळी सचिन साठे म्हणाले, आयुक्त श्रावण हर्डीकर हे पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष असल्यासारखे काम करत आहेत. भाजप सांगेल तसे कोणाचा फलक काढायचा कोणावर काय कारवाई करायची? कोणावर कारवाई करायची, कोणावर नाही करायची…हे काम त्यांचे चालू आहे. शहरात नगरसेवकांच्या नावे अनेक अनधिकृत फलक लागले असताना शहरवासियांच्या संवेदनशील प्रश्वांवर चालविलेल्या लढ्याचा फलक काढला आहे. तो फलक काढण्यास आयुक्तांनी पहिले प्राधान्य दिले. याचाच अर्थ आयुक्त हे भाजपचे शहराचे कार्यकारी अध्यक्ष असल्याचे सिद्ध झाले.

महापालिकेतून सध्या सुरु असलेला कारभार पाहता महापालिकेची इमारत भाजपचे मुख्य कार्यालय झाले आहे. भाजपने सरसकट शास्तीकर माफ केला पाहिजे. अनधिकृत बांधकामे नियमित केली पाहिजेत. अन्यथा, आगामी निवडणुकीत जनता सरकट भाजपची हकालपट्टी करतील, अशी टीका साठे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.