Pimpri: कोरोना व्हायरसमुळे महापालिका अधिकारी, कर्मचा-यांना ‘बायोमेट्रीक थम्ब’पासून सवलत

एमपीसी न्यूज – कोरोना हा विषाणू संसर्गजन्य आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी बचावात्मक उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन हजेरीत सवलत देण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत ही सवलत देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.  

चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने पुणे शहरात शिरकाव केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील पाच जण संशयित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये त्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. कोरोना हा व्हायरस संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे, गर्दीची ठिकाणे, शासकीय कार्यालयात उपाययोजना केल्या जात आहे.

बचावात्मक उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचा-यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन हजेरीत सवलत देण्यात आली आहे. जेथे थम्ब मशीन कार्यान्वित आहे. तेथील महापालिका कर्मचा-यांना  31 मार्चपर्यंत ही सवलत देण्यात आली आहे. परंतु, अधिकारी, कर्मचा-यांना हजेरी पटावर नियमितपणे निश्चित केलेल्या वेळेत स्वाक्षरी करावयाची आहे. सर्व आहारण-वितरण अधिका-यांनी त्यांच्या नियंत्रणाखाली हजेरी पत्रकाची नियमितपणे तपासणी करावयाची आहे. फिरतीचे कामकाज असलेल्या कर्मचा-यांनी फिरती रजिस्टिरला नोंदी कराव्यात. त्याची तपासणी आहारण-वितरण अधिकारी, विभागप्रमुखांनी करावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.