PCMC jansavad sabha : ‘जनसंवाद’ सभेत कपात, आता महिन्यातून दोनवेळाच सभा

एमपीसी न्यूज – नागरिकांच्या तक्रारींचा विहित वेळेत निपटारा करण्याकरिता वेळ मिळत नसल्याचे कारण देत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ‘जनसंवाद’ सभेत कपात केली आहे. आता केवळ प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या सोमवारी क्षेत्रीय कार्यालयनिहाय जनसंवाद सभा होणार आहे. नगरसेवक नसल्याने आणि प्रशासनानेही (PCMC jansavad sabha) ‘जनसंवाद’ सभेत कपात केल्याने नागरिकांनी दैनंदिन समस्यांबाबत कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक मुदतीत झाली नाही. त्यामुळे नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यापासून म्हणजेच 13 मार्च 2022 पासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरु आहे. नगरसेवक नसल्याने नागरिकांच्या पालिकेसंदर्भातील तक्रारी सोडविण्यासाठी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी दर सोमवारी जनसंवाद सभा घेण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा आदेश 14 मार्च 2022 रोजी काढला.

क्षेत्रीय स्तरावर नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रत्येक सोमवारी क्षेत्रीय कार्यालयानिहाय जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. पालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  या क्षेत्रीय कार्यालयामध्ये दर सोमवारी जनसंवाद सभा भरते. या सभेत नागरिक उपस्थित राहून पालिकेसंदर्भातील विविध समस्या मांडतात. पाणी, ड्रेनेज, वीज, रस्ते, खड्डे याबाबतच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक असते. नागरिकांना समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले होते. पण, प्रशासनाने जनसंवाद सभेत कपात केली आहे.

Kothrud fire : कोथरुडमधील श्रावणधारा इमारतीला भीषण आग

महापालिका कार्यालयीन कामकाजाचे प्रत्येक आठवड्यामध्ये केवळ पाच दिवस असल्याने तसेच रद आठवड्याला प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभा असल्याने या सभेमध्ये दाखल झालेल्या नागिरकांच्या तक्रारींचा निपटारा विहित वेळेत करण्याकरिता पुरेसा अवधी प्राप्त होत नाही. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाकडील जनसंवाद सभेमध्ये नागरिकांच्या प्राप्त होणा-या तक्रारी विहित वेळेत निकाली काढण्याकरिता जनसंवाद सभेत कपात केली आहे. प्रत्येक सोमवार ऐवजी महिन्याच्या दुस-या व चौथ्या सोमवारी क्षेत्रीय कार्यालयनिहाय जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी काढला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.