PCMC : बदल्यांचा हिशोब जुळेना आणि अधिका-यांची रजा संपेना!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) प्रतिनियुक्तीवर असलेले राज्यसेवेतील उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांना बदल्यांचे वेध लागले आहेत. चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी यासाठी प्रयत्न करण्याकरिता अधिकारी रजेवर असून बदली होत नसल्याने या अधिका-यांच्या रजेत वाढ होत आहे. घरुनच अधिकारी रजा वाढवून घेत आहेत. त्यामुळे बदल्यांचा हिशोब जुळेना आणि अधिका-यांची रजा संपेना अशी परिस्थिती प्रशासन झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी 13 एप्रिल रोजी उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजात मोठे फेरवाटप केले. या फेरवाटपामुळे अनेक अधिकारी नाराज झाल्याचे असल्याचे सांगितले जाते. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी बदलीसाठी प्रयत्न करत आहेत. त्याकरिता अनेक जण रजेवर गेले आहेत. तर, काही जणांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला आहे.

निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर 21 मार्चपासून (PCMC) रजेवर आहेत. त्यांचे बदलीसाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पण, त्यांना यश येताना दिसत नाही. त्यामुळे सातत्याने ते रजा वाढवून घेत आहेत. खांडेकर 4 मे 2023 पर्यंत रजेवर आहेत. आकाश चिन्ह व परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी हे देखील बदलीसाठी प्रयत्न करत आहेत. विभाग बदलताच 17 एप्रिलपासून जोशी रजेवर गेले आहेत. 4 मे पर्यंत ते रजेवर असणार आहेत.

Pune : कोथरुड परिसरातील समस्या तातडीने सोडवा – चंद्रकांत पाटील

भूमी आणि जिंदगी विभागाचे उपायुक्त सचिन ढोले हे देखील 17 एप्रिलपासून रजेवर गेले आहेत. त्यांचेही बदलीसाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जाते. ढोले हे 4 मे पर्यंत ते रजेवर असणार आहेत. ह क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे या 24 एप्रिल पासून रजेवर गेल्या आहेत.

28 एप्रिलपर्यंत त्या रजेवर आहेत. रजेवर गेलेल्या अधिका-यांच्या विभागाची जबाबदारी दुस-या अधिका-यांकडे सोपविली आहे. पण, या अधिका-यांना आपले मूळ काम सोडून अतिरिक्त कामकाज करावे लागत आहे. त्यामुळे कामात संथगती निर्माण झाल्याचे दिसते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.