PCMC News: जाहीर केलेल्या दिवशीही आयुक्त भेटेनात; नागरिकांची ओरड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत विविध (PCMC News) कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना भेटता यावे यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी भेटण्याचा वार, वेळ निश्चित केली. त्याबाबत जाहीर आवाहनही केले, मात्र नागरिकांसाठी निश्चित केलेल्या दिवशी आणि वेळेत आयुक्त महापालिकेत उपलब्धच नसतात.

त्यामुळे नागरिक हेलपाटे मारत आहेत. आज सोमवारी नागरिकांना भेटण्यासाठीची वेळ असताना आयुक्त आज महापालिकेत नव्हते. त्यातच जनसंवाद सभेतही कपात केल्याने प्रशासकीय राजवटीतील ‘हम करोसो कायद्या’ची प्रचिती नागरिकांना पदोपदी येत आहे.

नगरसेवकांचा कालावधी संपला आहे. त्यामुळे 13 मार्च 2022 पासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू आहे. नगरसेवक नसल्याने नागरिकांचा कामांसाठी आयुक्तांकडे भेटण्यासाठी ओघ असतो.

नागरिक विविध कामे घेवून आयुक्तांना (PCMC News)भेटण्यासाठी येतात. आयुक्त बैठकीत असल्याने नागरिकांना भेटीविना परत जावे लागते. नागरिकांचा हेलफाटा होतो. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांच्या भेटीसाठी वेळ राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिका कामकाजाच्यादिवशी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे आठवड्यातील तीन दिवस दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत आयुक्त नागरिकांना भेटतील, उपलब्ध होतील असे जाहीर केले.

पण,  निश्चित केलेल्या दिवशी आणि वेळेत आयुक्त महापालिकेत उपलब्धच नसतात, अशा तक्रारी आहेत. आज सोमवारी आयुक्तांची नागरिकांना भेटण्यासाठी दुपारी 3 ते सायंकाळी 6 पर्यंतची वेळ होती. पण, आयुक्त शेखर सिंह आज महापालिकेत नव्हते. आयुक्त सिंह यांचा ऑटो क्लस्टर  येथून बैठकाचा सिलसिला सुरु होता.

त्यामुळे आयुक्तांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांचा हेलपाटा झाला. आयुक्त सिंह हे महापालिका मुख्यालयाऐवजी ऑटो क्लस्टर  मधूनच कारभार करत आहेत. दरम्यान, सिंह यांनी नुकताच आयुक्तपदाचा तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण केला, मात्र या कालावधीत कामाची छाप पाडण्यात आयुक्त अपयशी ठरले आहेत.

मंगळवारची स्थायी समिती सभा लांबणीवर!

प्रशासकीय राजवट असली तरी स्थायी समितीची साप्ताहिक सभा दर आठवड्यात मंगळवारी होते. याचवेळी सर्वसाधारण सभाही घेतली जाते. या दोन्ही सभांच्या कामकाजानंतर आयुक्त विभागप्रमुखांची बैठक घेतात. उद्या (मंगळवारी) आयुक्त शेखर सिंह  मुंबईला जाणार असल्याने  स्थायी, सर्वसाधारण सभा लांबणीवर पडली आहे. तर, बुधवारपासून पुढील चार दिवस आयुक्त कार्यक्षेत्राबाहेर असल्याने महापालिकेचा कारभार कोण हाकणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.