Pimpri : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शुक्रवारी विविध संघटनांचे धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पिंपरी चिंचवड शहरातील विविध संघटनांनी विरोध केला आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी मुस्लिम बांधव तसेच विविध संघटना शुक्रवारी (दि. 20) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला देशभरात विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला काही राज्यांमध्ये हिंसक वळण लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील आयोजकांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनास शहरातील मुस्लिमेतर काही संघटनांनीही पाठिंबा दर्शविला आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी संबंधितांची बैठक घेऊन शहरातील कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवारी दुपारनंतर शहरातील विविध ठिकाणाहून आंदोलक पिंपरी चौकात गोळा होणार आहेत. ‘एनआरसी’ व ‘सीएबी’च्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आयोजकांसह पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.