PCMC : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रील्स स्टार्सच्या रील स्पर्धेला लाखोंचे लाइक्स, ‘हे’ आहेत स्पर्धेतील विजेते

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता करवसुलीसाठी आजपर्यंत विविध उपक्रम राबविले. (PCMC) नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विभागाने होर्डिंग, पॅम्पलेट, रिक्षातून जनजागृती, सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन आदी आघाड्यांवर काम केले. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रील्स, मीम्स, व्हिडीओ यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात असून, त्याला सर्जनशीलतेची जोडसुद्धा मिळत आहे. पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांमध्ये नव्या समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणावर पगडा निर्माण झालेला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील (PCMC) करदात्यांना कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी विभागाने सन 2022-23 मध्ये मीम्स स्पर्धा आयोजित केली. त्यास सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर, विभागाने सन 2023-24 या आर्थिक वर्षात ‘रील स्टार्स’ची ‘रील स्पर्धा’ आयोजित केली. त्या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शहरात कर भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती तसेच नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली.

मागील आर्थिक वर्षात विभागाने तब्बल 977 कोटींचा कर वसूल केला. नागरिकांनी वेळेत कर भरण्यासाठी विभागाने ‘एसएमएस अभियान’ राबवून नागरिकांना कायम सतर्क ठेवले. त्याचप्रमाणे रील स्पर्धेतील रील्समधून करण्यात आलेल्या आवाहनाच्या माध्यमातून नागरिकांना कॉमेडी, भावनिक संदेशामधून कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. यामुळेच नागरिकांच्या सहभागातून विभागाने कर संकलनाचा विक्रम रचला असून गेल्या 42 वर्षांच्या पालिका इतिहासात पालिकेने प्रथमच 977 कोटींचा टप्पा पार केला.

LokSabha Elections 2024 :  मावळमध्ये 114 पथके; निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला

 30 लाख लोकांपर्यंत पोहोचले रील स्पर्धेतील व्हिडीओ…

‘मिशीवर मारताय ताव आणि थकबाकीदारांच्या यादीत तुमचं पहिलं नाव?’, ‘तुझे थकबाकीदारांच्या यादीत नाव असेल तर मी लग्न करीत नाही’, ‘नळाचे गेले पाणी; घरावर आणीबाणी? तुमचीच होती जबाबदारी’ अशा आशयामुळे नागरिकांच्या मनात कर भरण्यासाठी असलेली अनास्था झटकून मोठ्या प्रमाणामध्ये कर भरण्यासाठी नागरिक पुढे सरसावले. स्पर्धेतील रील नागरिकांच्या पसंतीस उतरून तब्बल 30 लाख इतका प्रेक्षकवर्ग मिळाला. त्याचबरोबर स्पर्धेतील रील एक लाखाहून अधिक लोकांनी लाइक करून 30 हजारांवर नागरिकांनी ते शेअर केले.

 हे आहेत स्पर्धेतील विजेते

कर संकलन विभागाच्या रील स्पर्धेसाठी तब्बल पन्नासहून अधिक रील स्टार्स यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये व्यावसायिक, वकील, शाळकरी मुले, नोकरदार सर्व स्तरातील रील स्टार्स यांनी सहभाग नोंदविल्याने स्पर्धेतील आशय नागरिकांपर्यंत पोहोचून शहरात कर भरण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले. त्यामधूनच आशय, व्हिडीओ निर्मिती, विषयाला अनुसरून मांडणी आदींचे निरीक्षण करून स्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले आहेत.

– प्रथम क्रमांक : प्रकाश (पीयूष) मधुकर सजगणे
– द्वितीय क्रमांक : ज्योती भीमाशंकर सेतसंदी
– तृतीय क्रमांक : विष्णू धर्मा घासे
– चतुर्थ उत्तेजनार्थ क्रमांक : अस्लम रशीद शेख

पिंपरी-चिंचवड पालिकेचा कर संकलन विभाग जनजागृती करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवनवे अभिनव उपक्रम राबवित आहे. मा.आयुक्त  शेखर सिंह यांचे व्हिजन आणि मा. अतिरिक्त आयुक्त यांचे मार्गदर्शनातून यावर्षी सुद्धा शहरातील स्मारके, मानबिंदू यांच्याबद्दल स्केच स्पर्धा आणि नागरिकांचे विकासातील योगदान असा उपक्रम स्मार्ट सिटीच्या सहकार्याने हाती घेण्याचे प्रस्तावित आहे असे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.