PCMC : फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण; शहरात 17 हजार 437 फेरीवाले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) वतीने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 17 हजार 437 फेरीवाले शहरात असल्याचे सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे 4 हजार 89 तर ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वात कमी 1 हजार 19 फेरीवाले आढळून आले आहेत. शहरात 8 हजार 412 नवीन फेरीवाले वाढले असून सर्वेक्षण झालेल्या फेरीवाल्यांची कागदपत्रे शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहेत. त्यानंतर 15 फेब्रुवारीला फेरीवाल्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

याबाबतची माहिती भूमी व जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी दिली. कामगारनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने शहरातील पथारीवाल्यांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले. शहरातील फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाला 1 नोव्हेंबर 2022 रोजी सुरुवात झाली. त्यानंतर सर्वेक्षण पूर्ण न झाल्याने दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली.

Bopkhel : 15 वर्षीय मुलीला फूस लावून पळवले

10 जानेवारीपर्यंत दिलेल्या अंतिम मुदतीत (PCMC) शहरात 17 हजार 437 फेरीवाले आढळून आले आहेत. यामध्ये अ क्षेत्रीय कार्यालय परिसरात 4 हजार 89, ब मध्ये 1 हजार 795, क मध्ये 2 हजार 366, ड मध्ये 1 हजार 89, ई मध्ये 1 हजार 728, फ मध्ये 2 हजार 832, ग मध्ये 1 हजार 568 तर ह मध्ये 2 हजार 40 फेरीवाले आहेत. शहरात यापूर्वी 9 हजार 25 फेरीवाल्याची नोंद होती. आता फेरीवाल्यांची संख्या 17 हजार 437 झाली असून तब्बल 8 हजार 412 फेरीवाले वाढले आहेत.

शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता फेरीवाल्यांची रेशन कार्ड, आधार कार्ड, दिव्यांग, घटस्फोटीता, परितक्ता महिलांसाठी अनुषंगिक पुराव्याची प्रत, जातीचा दाखला अपलोड करण्यात येणार आहे. 15 फेब्रुवारीला यादी प्रसिध्द केली जाईल. हरकती व सूचना मागविण्यासाठी 1 महिन्यांची म्हणजे 15 मार्चपर्यंत मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतर शहर फेरीवाला समितीच्या मान्यतेनंतर 1 एप्रिल (PCMC) रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल, असे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.