PCNTDA News : विलिनीकरणामुळे प्राधिकरणाची जागा लाटण्याच्या भाजप नेत्यांच्या मनसुब्यावर पाणी – योगेश बहल

चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेबद्दल भाजपा नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे ‘पीएमआरडीए’मध्ये विलिनिकरण करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतल्याने शहरातील नागरिकांचा फायदाच होणार आहे. भाजपाच्या काही नेत्यांचा प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून त्याच जागा लाटण्याचा आणि स्वत:ची खळगी भरण्याच्या प्रयत्नावर पाणी पडल्याने ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेत असल्याचा पलटवार माजी महापौर व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी केला.

तथ्यहिन आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना शहरातील जनता ओळखून आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्तेत असताना साडेबारा टक्के परतावा आत्ता का द्यायचा?, बाधित नागरिक त्यावेळी न्यायालयात का गेले नाहीत, असा सवाल केला होता. त्यावर भाजप नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहनही बहल यांनी दिले.

विलिनीकरण करण्याचा निर्णयावर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना बहल यांनी म्हटले आहे की, प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र हे 1856.90 हेक्टर आहे. विकसीत झालेले 1633 हेक्टर इतके क्षेत्र महापालिकेकडे हस्तांतरीत होणार असून केवळ 223 हेक्टर क्षेत्र हे ‘पीएमआरडीए’कडे जाणार आहे. त्यामुळे भाजपाचे नेते कोणताही अभ्यास न करता केवळ आरोप करत सुटले आहेत.

जे क्षेत्र महापालिकेकडे हस्तांतरीत झाले आहे त्या ठिकाणी बांधकाम परवाना महापालिका देणार आहे. त्यामुळे महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रासाठी मंजूर एकत्रीकृत विकास, नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदींनुसार आता दोन्ही क्षेत्रांसाठी रस्ता रुंदीसापेक्ष मूळ चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय), प्रिमियम चटई क्षेत्र निर्देशांक किंवा टीडीआरसह एकूण बांधकाम क्षमता एकसमान लागू होणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे प्राधिकरणाच्या विलिनिकरणाचा निर्णय तात्कालीन भाजपा सरकारने तीन वर्षांपूर्वीच घेतला होता. काही कारणामुळे त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. जे लोक राजकीय जीवनात अजित पवारांच्या जिवावर मोठे झाले तेच आता आरोप करत आहेत ही खेदजनक बाब आहे.

सध्या केवळ शासन निर्णय झालेला आहे. विलिनिकरणाची प्रक्रिया पुढील सहा महिने चालू राहणार आहे. शासन आदेश अद्याप आलेला नाही. शहर हिताचे निर्णय घेण्यास अजितदादा बांधिल असतानाही नेमके शहराचे काय नुकसान होणार हे भाजपच्या नेत्यांनी मांडणे अपेक्षित असताना केवळ आरोप करत आहेत यातूनच त्यांची मानसिकता दिसून येते.

चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेबद्दल भाजपा नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी

राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना महसूलमंत्री, शेवटच्या टप्प्यात पुण्याचे पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटील यांनी प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत प्राधिकरणाने संपादित केलेल्या जमिनीचा साडेबारा टक्के परतावा आत्ता का द्यायचा?, बाधित नागरिक त्यावेळी न्यायालयात का गेले नाहीत? तब्बल 44 वर्षानंतर जमिनीचा परतावा देणे शक्य होईल का? ,याचा लाभ कोणाला होणार आहे. सन 1974 सालचे शेतकरी हयात आहेत का? जागा दिल्यास बाधित नागरिक त्याचे काय करणार? असा सवाल करत शेतकर्‍यांना परतावा देण्यास विरोध केला होता.

ज्या भूमिपूत्रांनी दिलेल्या जमिनीमुळे प्राधिकरण उभे राहिले. त्या भूमिपूत्रांचा अवमान करत त्यांना हक्काचा मोबदला नाकारणार्‍या चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल भाजपाच्या एकाही नेत्याने अद्यापपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. अगोदर त्यावर भूमिका स्पष्ट करावी.

प्राधिकरणाच्या विलीनीकरणावर बोलणार्‍या भाजपाच्या स्थानिक नेत्यांना साडेबारा टक्क्याच्या परताव्याचा आलेला कळवळा म्हणजे पुतणामावशीचे प्रेम असून ही केवळ नौटंकी आहे. भूमिपूत्रांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कटिबद्ध असल्याचेही बहल यांनी या पत्रात म्हटले आहे.

साडेबारा टक्के परतावा मिळणार

पिंपरी-चिंचवड नगनगर विकास प्राधिकरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या त्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा देण्याचा निर्णय शरद पवार यांनीच घेतला होता. अनेक शेतकऱ्यांना परतावा देखील मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांना परतावा मिळालेला नाही त्यांना परतावा देण्यास महाविकास आघाडी सरकार बांधिल आहे.

परताव्याची प्रक्रिया पुढेही कायम राहणार असून त्यामध्ये कोणताही खंड पडणार नाही. केवळ शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचा व गैरसमज पसरविण्याचा प्रकार भाजपाच्या मंडळींकडून सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने व शेतकऱ्यांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही बहल यांनी केले.

जशास तसेच उत्तर देऊ

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सध्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह नेत्यांनी भ्रष्ट कारभार करत सर्वसामान्य जनतेच्या पैशांची लूट चालविली आहे. मयताच्या टाळूवरील मलिदा खाणाऱ्या ठेकेदारांची बाजू घेणारे पक्षनेते नामदेव ढाके सारख्या व्यक्ती अजितदादांवर टीका करतात यापेक्षा दुसरे दुर्देव काय असू शकते. ज्या लोकांच्या हाती शहरातील जनतेने विश्वासाने सत्ता दिली त्यांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला.

स्वत:ची पापे लपविण्यासाठी आमच्या नेत्यांवर यापुढे आरोप केल्यास जशास तसेच उत्तर दिले जाईल. आम्हालाही खालची भाषा वापरात येते मात्र आमच्या नेत्यांची ती शिकवण नाही, त्यामुळे आम्ही अद्यापही सौम्य भाषेचाच वापर करीत आहोत. यापुढे त्यांनी बिनबुडाचे आरोप न थांबविल्यास त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशाराही बहल यांनी या पत्राद्वारे दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.