Pimpri news: पाळीव कुत्रा, मांजराच्या दहनासाठी आता 1 हजार रूपये मोजावे लागणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कुत्रा, मांजर यासारख्या छोट्या पाळीव प्राण्यांचा मृत्यु झाल्यास नेहरूनगर येथील दहनभुमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यासाठी या प्राण्यांच्या मालकांना शुल्क मोजावे लागणार आहे. कुत्रा, मांजर यांचे दहन करण्यासाठी एक हजार रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर, शहराबाहेरील प्राणी मालकांना एक हजार रूपये शुल्क आकारूनच ही सेवा दिली जाणार आहे.

महापालिका हद्दीत कुत्रा, मांजर यासारख्या छोट्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांचा मृत्यु झाल्यास अशा मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पिंपरी – नेहरुनगर येथे 2007 मध्ये छोटे प्राणी दफन भुमी कार्यान्वित करण्यात आली होती. त्यानंतर याठिकाणी दहन मशिनही बसविण्यात आली.

या दहन मशिनच्या ठिकाणी 16 डिसेंबर 2016 ते 16 मार्च 2020 या कालावधीत एकूण 1 हजार 309  इतक्या पाळीव प्राण्यांची दहन पध्दतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. ही सेवा नि:शुल्क आहे. याकरीता सीएनजी गॅस वापरापोटी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांना सरासरी 15 हजार ते 20 हजार रूपये इतकी मासिक रक्कम देण्यात येते. पावसाळ्यात या पाळीव प्राण्यांच्या मृतांच्या आकड्यांत वाढ होत असते.

मागील काही दिवसांपासून स्वयंघोषित प्राणीप्रेमींद्वारे शहरातील भटक्या मृत कुत्र्यांना दफन भूमीत आणून त्यांचेही या ठिकाणी दहन केले जाते. वस्तुत: ही सेवा पाळीव प्राण्यांकरीता म्हणजेच ज्यांचे मालक आहेत, त्यांच्याकरिता निशु:ल्क आहे. भटक्या मांजर, कुत्रा यासारख्या प्राण्यांची महापालिका आरोग्य विभागाद्वारे क्षेत्रीय कार्यालय निहाय विल्हेवाट लावण्यात येते.

पुणे महापालिकेद्वारे मशिन देखभाल दुरुस्ती, गॅसची देयके तसेच मशिन हाताळणारे महापालिकेचे कर्मचारी यांचा एकूण खर्च पाहता महापालिकेवर जास्तीचा आर्थिक भार पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी मृत पाळीव प्राण्यांच्या मालकांना प्रति जनावर शुल्क आकारणी करण्याचे ठरविण्यात आले आहे.

त्यानुसार, महापालिका हद्दीतील पाळीव मृत कुत्रा आणि मांजर यांच्यासाठी एक हजार रूपये दहन शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच महापालिका हद्दीबाहेरील प्राणी मालकांना देखिल एक हजार रूपये इतके शुल्क आकारले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.