Pet Incinerator : बिघाड झाल्याने मृत श्वानांची विल्हेवाट लावणारी मशीन 14 सप्टेंबरपर्यंत राहणार बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिरंतन भूमी नेहरूनगर येथील मृत श्वानांची विल्हेवाट लावणा-या दहन मशिनमध्ये (Pet Incinerator) बिघाड झाल्याने 7 ते 14 सप्टेंबर 2022 या कालावधीत दुरुस्ती कामानिमित्त दहन मशीन बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत पाळीव प्राण्यांसाठी विविध सेवा सुविधा पुरविल्या जातात. श्वानांच्या वैद्यकीय उपचारासोबतच मृत श्वानांची विल्हेवाट लावण्याचे काम देखील या विभागामार्फत करण्यात येते. यासाठी महापालिकेच्या वतीने चिरंतन भूमी नेहरूनगर येथे मृत श्वानांचे विल्हेवाट लावण्याकरीता दहन मशिन कार्यरत आहे. या मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मशिन दुरुस्त करण्यासाठी 7 ते 14 सप्टेंबर या कालावधीत मशीन बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीमध्ये श्वान मालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मृत श्वानांची विल्हेवाट लावण्यासाठी श्वान मालकांनी पुणे महापालिकेच्या हद्दीतील नायडू पॉन्ड, नायडू हॉस्पिटल मागील बाजूस, ताडीवाला रोड येथील दहन मशीनचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच, मृत श्वानांची विल्हेवाट लावण्यासाठी नियमानुसार शुल्क अदा करणे (Pet Incinerator) आवश्यक असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी दिली.

Talegaon Dabhade : पेपरचा पुरवठा न झाल्याने परीक्षा रद्द करण्याची नामुष्की

महापालिकेच्या वतीने शहरात प्राणी सुश्रुषा केंद्र स्थापन करून (अॅनिमल शेल्टर हाऊस) भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्राणी सुश्रुषा केंद्राच्या माध्यमातून भटक्या श्वानांसाठी प्रशस्त व सुविधायुक्त आंतररुग्ण विभाग निर्माण करण्यात आले असून या ठिकाणी अनेक भटक्या श्वानांवर उपचार करण्यात येत आहे. तसेच, पाळीव प्राण्यांसाठी सुसज्ज बाह्यरुग्ण विभाग देखील निर्माण करण्यात आला आहे.

या ठिकाणी सोनोग्राफी, एक्स-रे सुविधा तसेच सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी आधुनिक व सुविधायुक्त दालन निर्माण करण्यात आले आहे. तसेच श्वान मनुष्य संघर्ष जनजागृती कक्ष आणि प्राण्यांबाबत नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी तक्रार निवारण कक्ष उभारण्यात आले आहे. आधुनिक पद्धतीने पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यात येत आहे. नागरिकांनी मृत श्वानांची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी सेवेचा वापर करावा, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाचे उपआयुक्त सचिन ढोले यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.