Pimpri: हिवाळ्यातच पाणी कपात!, सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा; आयुक्तांची माहिती

एमपीसी न्यूज- पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना हिवाळ्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सोमवार (दि.19) पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) दिली. पाण्याची टंचाई नसून समन्यायी पाणी वाटपासाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दोन महिनेही कपात असणार आहे. यापूर्वी एकदिवसाआड पाणी पुरवठा केला होता. तेव्हा पाण्याच्या तक्रारी कमी झाल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा विभागाचे काम अप्रिय असल्याचेही त्यांनी मान्य केले.

पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही पाण्याची टंचाई आहे. त्यावर तात्पुरता आणि कायमस्वरुपी उपाय काढण्यासाठी आयुक्त हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) बैठक घेतली. महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांच्यासह प्रभाग समितींच्या अध्यक्ष, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत सोमवारपासून एक दिवसाआड पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी बैठकीची माहिती पत्रकारांना दिली.

शहराची लोकसंख्या 27 लाखाच्या आसपास असून एक लाख 50 हजार नळजोड आहेत. महापालिका दिवसाला 500 एमएलडी पाणी उचलते. त्यापैकी 38 ते 40 तूट आहे. तूट कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आजमितीला 600 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, असमान पाणीवाटपामुळे काही भागांना कमी पाणीपुरवठा होत आहे. उंचावरील वाकड, पिंपळेसौदागर, पिंपळेनिलख, सांगवी, दापोडी, दिघी, मोशी, च-होली या भागाला कमी पाणी जाते. त्यामुळे सगळ्या भागाला समन्यायी पाणी वाटप होणे अपेक्षित आहे.

एकदिवसाआड पाणीपुरवठा केल्यास समन्यायी पाणी पुरवठा होत होता. पाण्याची टंचाई नसतानाही पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे यासाठी एकदिवसाड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दोन महिने ही पाणी कपात असणार आहे. दोन महिन्यात पाणीपुरवठा विभागाने त्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत. यावर्षी पाणीटंचाईचे सावट नाही. पाणी पर्याप्त आहे. बचतीचे धोरण चांगले असून समन्यायी पाणी वाटपासाठी हा निर्णय घेतला आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

अनधिकृत नळजोड, मोटारी जप्त करुन दोन महिन्यात सुसुत्रता आणायची आहे. दोन महिन्यात कोणतीही सुधारणा न झाल्यास त्याला पाणीपुरवठा विभाग जबाबदार राहील. पाणीपुरवठा विभागाचे काम अप्रिय, असमाधानकारक आहे. दोन महिन्यात सुधारणा नाही झाल्यास कोणतेही कारण चालणार नाही. वॉलमन, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या जबाबदा-या निश्चित केल्या आहेत. नियोजनब्ध काम केल्यास सहा महिन्यात पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थमध्ये निश्चित बदल होईल असा विश्वासही आयुक्त हर्डीकर यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.