Pimpri: सभागृह नेतेपदासाठी नामदेव ढाके;  विभागीय आयुक्तांकडे शिफारस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या गटनेते तथा सभागृहनेतेपदी नामदेव ढाके यांची निवड करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीचे पत्र पुण्याच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांनी आज (बुधवारी) दिली. या फेरबदलाला विभागीय आयुक्तांची मान्यता मिळताच महापौर उषा ढोरे या ढाके यांना निवडीचे पत्र देतील. त्यानंतर अधिकृतपणे ढाके यांची सभागृहनेतेपदी निवड होईल.

फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून जुने आणि भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते एकनाथ पवार यांच्याकडे सभागृह नेतेपदाची धुरा होती. तीन वर्ष त्यांनी सक्षमपणे कामकाज केले. परंतु, आमदारद्वियांचा वाढता हस्तक्षेप, निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याने पवार यांनी सोमवारी (दि.10) तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्या जागी ढाके यांची वर्णी लागली आहे.

भाजपच्या बैठकीत ढाके यांच्या नावावर एकमत करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीचे पत्र पुण्याचे विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांना देण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांचे पत्र येताच महापौर उषा ढोरे या ढाके यांना पत्र देतील. त्यानंतर ढाके यांची अधिकृतरित्या सभागृहनेतेपदी नियुक्ती होईल.

…..अखेर न्याय मिळाला!
प्रभाग क्रमांक 17 वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगरमधून ढाके पहिल्यांदाच निवडून आले आहेत. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले ढाके पहिल्या अडीच वर्षात महापौरपदासाठी प्रबळ दावेदार होते. परंतु, सत्तासंघर्षामध्ये त्यांची संधी हुकली. आता सभागृहनेतेपदी वर्णी लागल्याने निष्ठावंताला अखेर न्याय मिळाला आहे. त्यांनी यापूर्वी भाजपच्या कामगार आघाडीचे शहराध्यक्षपद देखील भूषविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.