Pimpri: नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्थायी समिती सभेला तहकुबीचा नाट!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची नवीन वर्षातील आजची पहिलीच सभा तहकूब करण्यात आली. वर्षाच्या सुरुवातीलाच सभेला तहकुबीचा नाट लागला आहे. विषय पत्रिकेवरील आठ विषयांमध्ये ‘सेटिंग’ झाली नसल्याने सभा तहकूब केल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) आयोजित करण्यात आली होती. विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

दुपारी दोन वाजता स्थायी समितीची सभा सुरु झाली. सभा सरु होताच अध्यक्षांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अध्यक्षांनी अधिका-यांच्या जागेवर जाऊन त्यांना गुलाबाचे फुल दिले. त्यानंतर आजची सभा पुढील बुधवारपर्यंत म्हणजेच तब्बल आठ दिवस लांबणीवर टाकली. त्यामुळे विषय पत्रिकेवरील अनेक महत्वाचे विषय लांबणीवर पडले आहेत. विषय पत्रिकेवरील आठ विषयांमध्ये ‘सेटिंग’ झाली नाही. त्यामुळेच स्थायी समितीची आजची सभा तहकूब केल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, दापोडीतील सीएमई येथे पुल बांधणी सरावावेळी झालेल्या अपघात निधन झालेले जवान भिवा वाघमोडे, संजीवन पी.के. जयसिंग जगताप, नामदेव ढोरे यांना सभेत श्रध्दांजली वाहिली. श्रद्धांजली वाहून आजची स्थायी समितीची सभा बुधवार (दि. 8) पर्यंत तहकूब केल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.