Pimpri : कायम विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहून नव्या गोष्टी आत्मसात करत रहा – चेतन भगत

एमपीसी न्यूज – परीक्षा पास होऊन आज तुम्ही व्यवहारीक जगात प्रवेश करणार (Pimpri) आहात. आयुष्यात नोकरी, व्यवसाय करून स्थिरावणे हे आता तुमचे उद्दीष्ट असेल. मात्र, असे जरी असले तरी कायम विद्यार्थ्याच्या भूमिकेत रहा, नव्या गोष्टी आत्मसात करा. बदलत्या काळाबरोबर स्वतःत बदल करत रहा, असे केलेत तर तुम्ही आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असे मार्गदर्शन इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध लेखक, स्तंभलेख, यूट्यूबर चेतन भगत यांनी पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील बी स्कूलमधून एमबीए पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांना केले.

आज (शुक्रवारी) डॉ. डी. वाय. पाटील बी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ विद्यापीठ मुख्यालयातील सभागृहात पार पडला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चेतन भगत बोलत होते. या कार्यक्रमाला प्रसिद्ध कोच आणि आणि अध्यात्मिक मार्गदर्शक खुर्शीद बाटलीवाला आणि ध्यानधारणा विषायातील तज्ज्ञ आणि उपयोजित उपचारतज्ज्ञ दिनेश घोडके हे उपस्थित होते. याशिवाय डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र कुलगुरू डॉ. भाग्यश्री पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन. जे. पवार, डॉ. रोहिणी पाटील, संचालक डॉ. अमोल गावंडे, अधिष्ठाता डॉ.अतुलकुमार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चेतन भगत यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना पॉवरपॉईंत प्रेझेंटेशन आणि भाषण यांच्या माध्यमातून 11 सूत्रे समजावून सांगितली. ते म्हणाले कधीही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.जीवनाच्या स्पर्धेत सतत पुधे राहण्याचा प्रयत्न करा, इंग्रजी भाषा आजच्या युगात येणे आवश्यक आहे. पण साधी सोपी इंग्लिश आत्मसात करा. अगदी फर्डे इंग्लिश आलेच पाहिजे असे नाही. सतत आपल्याला साध्य करायच्या असलेल्या उद्दीष्टांचा पाठलाग करत रहा.आहे त्या परिस्थितीत अ‍ॅडजस्ट व्हायचा नेहमी प्रयत्न करा. झुरळ जसे सांदीकोपर्‍यात कुठेही तगून राहते तसेच प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घ्या. एकदम मोठे ध्येय उराशी बाळगू नका. मोठ्या ध्येयाचे छोटे छोटे टप्पे तयार करा. ते पार करण्याचा प्रयत्न करा. एकदम हत्ती गिळण्याचा प्रयत्न करू नका. लोकांशी संवाद साधा. कितीही शिकलात तरी लोकाशी संवाद साधण्याचे कसब कोणत्याही विद्यालयात मिळत नाही ते आत्मसात करावे लागते.सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमवा, वाचवा आणि गुंतवा ही त्रिसूत्री कायम लक्षात ठेवा. अन्यथा आयुष्य पोकळ डामडौलाच्या मागे लागून ईएमआय भरण्यात जाईल. मी ही त्रिसूत्री अमलात आणली म्हणूनच नोकरीतून बाहेर पडून मला आवडणारे लेखन मी करू शकलो.

भगत यांच्या भाषणाला विद्यार्थ्यांनी मनापासून दाद दिली –

खुर्शीद बाटलीवाला यांनी विद्याथ्यांना मार्गदर्शन करताना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जीईटी हा फॉर्म्युला सांगितला.ते म्हणाले तुम्हाला काय हवे ते अर्थात गेन निश्चित करा. त्यासाठी परिश्रम अर्थात एफर्टस आणि समय म्हणजेच टाईम यांचा सुयोग्य वापर करावा. कधीही (Pimpri) मनःशांती ढळू देऊ नका.चांगले अन्न, शांत झोप, योग्य श्वसन आणि शांत मन ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ध्यानधारणा विषायातील तज्ज्ञ आणि उपयोजित उपचारतज्ज्ञ दिनेश घोडके यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले.
सुरुवातीस डॉ. भाग्यश्री पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अर्पित त्रिवेदी आणि डॉ. सोनाली शहा यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.