Pimpri : अकार्यक्षम आयुक्तांमुळेच पाण्याची कृत्रिम टंचाई -श्रीरंग बारणे

अधिकारी झाले ठेकेदार, कामात भागीदार, टँकर लॉबी बंद करा; शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार

एमपीसी न्यूज – पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नाही. महापालिका उचलत असलेल्या 520 एमएलडीपैकी 200 एमएलडी पाण्याची गळती होत आहे. यापूर्वी देखील गळती होत होती. पण, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निष्क्रियतेमुळे आता गळतीचे प्रमाण वाढले आहे. टँकरवाले पाणी पुरवू शकतात. तर, महापालिका पुरेसे पाणीपुरवठा का करु शकत नाही? असा सवाल करत अकार्यक्षम आयुक्तांमुळेच पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. अधिकारी ठेकेदार, कामात भागीदार झाले आहेत. टँकर लॉबी बंद करावी. नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करावा. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्या संदर्भात खासदार बारणे यांनी आज (शुक्रवारी) आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर सविस्तर चर्चा केली. शिष्टमंडळात शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन भोसले, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, रेखा दर्शिले, चिंचवड महिला आघाडीच्या संघटिका अनिता तुतारे यांचा समावेश होता.

बैठकीची माहिती देताना खासदार बारणे म्हणाले, शहराला पुरेसे आणि समान पाणीपुरवठा होत नाही. तोपर्यंत महापालिकेने अल्प दरात टँकरने पाणीपुरवठा करावा. विहिरी, बोअरवेल हे पाण्याचे स्त्रोत ताब्यात घ्यावेत. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात यावे. संपुर्ण शहराला समान पाणीपुरवठा करण्यात यावा.

महापालिका प्रशासन पाणी गळती, चोरी रोखू शकले नाही. पाणी चोरी शोधण्याचे काम कोणाचे आहे. महापालिका कोट्यवधी रुपयांचे नुकसान करत आहे. अनधिकृत नळजोड एका दिवसात झाले नाहीत. ते रोखण्याचे काम प्रशासनाचे होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले. जेएनयूआरएन, अमृत योजनेअंतर्गत सातत्याने पाण्याचे मीटर बदलले. परंतु, पाणीगळती रोखू शकले नाहीत. ठेकेदार पोसण्यासाठीच हे केले जात आहे का? याचा संशय येत आहे. पाणीप्रश्न सोडविण्यात प्रशासन निष्क्रिय ठरले आहे. आयुक्तांचा वचक राहिल नाही. तक्रारींना केराची टोपली दाखविली जात आहे. आजपर्यंतच्या पाणीपुरवठ्याच्या निविदांची चौकशी करावी. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

अधिकारी झाले ठेकेदार, कामात भागीदार
शहरातील पाणीपुरवठ्यावर महापालिकेने आजपर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. जेएनयूआरएन, अमृत योजनेअंतर्गत सातत्याने पाण्याचे मीटर बदलले आहेत. वाढीव दराच्या त्या निविदा होत्या. आता अधिकारी ठेकेदार झाले आहेत. अनेक कामांमध्ये त्यांची भागीदारी आहे, असा आरोपही बारणे यांनी केला.

टँकर लॉबी बंद करा
खासगी टँकरवाले कोठून पाणी उचलतात. ते पाणी शुद्ध असते की अशुद्ध असते. पाण्याचे नमुने तपासले जातात का? अशुद्ध पाण्यामुळे साथीचे रोग वाढत आहेत. शहराचे आरोग्य धोक्यात आणण्याचे काम महापालिका प्रशासन करत आहे. त्याला संपुर्णपणे आयुक्तच जबाबदार आहेत. महापालिकेने तातडीने टँकर लॉबी बंद करावी. टँकर लॉबी बंद करता येते. आयुक्तांनी नाहक दिशाभूल करु नये असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.