Pimpri : दुकानात घुसून चौघांना कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – दुकानात घुसून दुकानाचे शटर बंद करून चौघांना कोयत्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 11) रात्री पावणेनऊच्या सुमारास कामगारनगर पिंपरी येथे घडली.

विजय अवतराम लाडकाणी (वय 55, रा. रॉयल वर्ल्ड शाळेजवळ, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय यांचे कामगारनगर पिंपरी येथे अमित ट्रेडर्स हे दुकान आहे. सोमवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास फिर्यादी विजय त्यांचे भाऊ घनश्याम अवतराम लाडकाणी, सुनील जयदेव लाडकाणी आणि मुलगा मनीष विजय लाडकाणी हे चौघे दुकानात होते. त्यावेळी आरोपी दुकानात आले. त्यांनी दुकानाचे शटर बंद केले. विजय यांच्या हाताच्या दंडावर, डोक्यावर, घनश्याम यांच्या डाव्या मांडीवर सुनील यांच्या हाताच्या पंज्यावर आणि मनीष याच्या डोक्यात मागच्या बाजूने कोयत्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये चौघेजण जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.