Pimpri: बेजबादार व्यक्तव्य करणा-या सभागृह नेत्याच्या तोंडाला भर चौकात काळे फासणार – दत्ता साने

सभागृह नेत्याची महासभेला दांडी

एमपीसी न्यूज – नगरसेवक महापालिकेत चोर्‍या करायला येतात का? कोणते नगरसेवक चोर आहेत? त्यांची सभागृहात नावे जाहीर करावीत, अन्यथा अकलेचे तारे तोडणार्‍या, बेजबादार वक्तव्य करणारे सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या तोंडाला भर चौकात काळे फासणार आहे, असा इशारा माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक दत्ता साने यांनी दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची डिसेंबर महिन्याची तहकूब झालेली सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) झाली. सभागृह नेते एकनाथ पवार यांनी तीन दिवसांपूर्वी खासगी वाटाघाटीच्या विषयात आर्थिक हित जोपासणार्‍या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच शहरातील माजी नगरसेवकांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या मिळकतींचे सर्वेक्षण करून मिळकत एकूण किती जागेत आहे आणि मिळकतकर किती जागेचा भरला जातो, हे जनतेसमोर ठेवण्याची मागणी केली होती. याचे सर्वसाधारण सभेत तीव्र पडसाद उमटले. दरम्यान, वादाच्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते एकनाथ पवार आज सभेला गैरहजर होते.

सभेच्या सुरूवातीलाच माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी एकनाथ पवार यांचा जाहीर निषेध केला. नगरसेवक महापालिकेत चोर्‍या करायला येतात का? कोणते नगरसेवक चोर आहेत? त्यांची सभागृहात पवारांनी नावे जाहीर करावीत. अन्यथा, अकलेचे तारे तोडणार्‍या पक्षनेते पवार यांच्या तोंडाला भर चौकात काळे फासणार, असा इशारा साने यांनी दिला.

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी देखील पवार यांचा निषेध व्यक्त केला. कोण वाटाघाटी करते? कोणाची थकीत बिले आहेत? असा सवाल करत पक्षनेते स्वतःचे अपयश लपविण्यासाठी अशी पत्रके काढत आहेत. सत्ताधारी पक्षाचे गटनेते बेजबाबदार वक्तव्य करत आहेत. त्यांनी सभागृहात येऊन माफी मागण्याची मागणी कलाटे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.