Pimpri : जालन्यातील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी-चिंचवड बंद

एमपीसी न्यूज – जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन (Pimpri) करणा-यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी-चिंचवड बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व कंपन्या, कारखाने, शासकीय सेवा, शाळा, महाविद्यालये, शहरातील व्यापारी यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. पिंपरीगाव ते आंबेडकर चौका दरम्याम मोर्चाही काढण्यात येणार आहे. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने विविध आंदोलने करत आहे. लाखोंच्या संख्येने शांततेत निघालेल्या 58 मूक मोर्चे महाराष्ट्राने व जगाने पाहिले आहेत. यामागणीसाठी आजवर 42 च्या वर तरुणांनी आत्मबलिदान दिले आहे; परंतु ही न्याय्यी मागणी आजवर कोणतेही सरकार पूर्ण करू शकले नाही.

मराठा समाजाला कुणावरही अन्याय न करता कोर्टात टिकणारे आरक्षण ओ.बी.सी. प्रवर्गातून हवे आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील व सहकारी संविधानाने दिलेल्या अधिकारात शांततेत आंदोलन करत होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो माता भगिनी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व तरुण वर्ग उपस्थित होता.

हे आंदोलन उधळून लावण्याच्या हेतूने राज्य सरकारने पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून अमानुषपणे लाठी हल्ला केला. अश्रुधूर सोडला हवेत गोळीबार केला. यामध्ये शेकडो माता-भगिनी, लहान मुले व ज्येष्ठ आंदोलक जखमी झाल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील मराठा समाजात प्रचंड चीड निर्माण झाली (Pimpri) आहे. याच्या निषेधार्थ मराठा क्रमंती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी पिंपरी-चिंचवड शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. यामधून आरोग्यसेवा व अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. सर्व कंपन्या, कारखाने, शासकीय सेवा, शाळा, महाविद्यालये, शहरातील व्यापारी यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या –

मराठा समाजाला ओ.बी.सी. प्रवर्गातून आरक्षण द्यावे, जातीनिहाय जनगणना करावी, एकाच पक्षाचे असलेले केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी तातडीने हालचाली करून आरक्षण मार्गातील सर्व अडथळे दूर करावेत व मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यावे. समाजाची दिशाभूल करू नये.

आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी राज्य सरकारने करावी. अमानुषलाठी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. मराठा आरक्षण आंदोलकावर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत. या आंदोलनाला पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पक्ष, संघटनांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे, असे मराठा क्रांती मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर समन्वयकांनी स्पष्ट केले आहे.

Talegaon Dabhade : आदर्श व्यक्तिमत्त्व बनविणे हे मोठे आव्हान – डॉ. संभाजी मलघे

या पत्रकार परिषदेला गौतम चाबुकस्वार,प्रकाश जाधव,सतिश काळे,कैलास कदम,सचिन चिखले,धनाजी येळकर,सचिन भोसले,काशिनाथ नखाते,प्रविण कदम, जितू दादा पवार, नकुल भोईर,जिवन बोराडे,मनोज गायकवाड, लक्ष्मण रानवडे, गणेश सरकटे, सुनीता शिंदे, संदिप नवसुपे, विनायक रणसुभे, वैभव जाधव, अभिषेक म्हसे, सागर तापकीर, गणेश जाधव उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.