Pimpri-chinchwad : महापालिकेचा मालमत्ता बिल वाटपांसाठी सिध्दी 2.0 प्रकल्प!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने गतवर्षीप्रमाणेच 2024-25 या आर्थिक वर्षात महिला बचत गटातील महिलांमार्फत मालमत्ता कराची बिले वाटपासाठी सिध्दी 2.0 हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी हा प्रकल्प यशस्वी झाल्यामुळेच पहिल्या तीन महिन्यात 50 टक्के मालमत्ता कर (Pimpri-chinchwad )वसूल झाला होता. बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा (Pimpri-chinchwad )महापालिकेचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम हाती घेतला आहे.

शहरात 6 लाख 25 हजार निवासी, व्यावसायिक, औद्योगिकसह इतर मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांना महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने कर आकारणी केली जाते. गतवर्षी या मालमत्ताधारकांना महिला बचत गटाच्या माध्यमातून घरोघरी बिले पोहोचवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. अवघ्या दिड महिन्यात पालिकेच्या इतिहासात प्रथमच 100 टक्के मालमत्ता धारकांना बिले घरपोच मिळाली होती. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच मालमत्ताधारकांनी विविध कर सवलतींचा लाभ घेवून 447 कोटी रूपये म्हणजे 50 टक्के मालमत्ता कर वसूल करण्यात या विभागाला यश आले होते.

Pimpri-chinchwad : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिलांवर महापालिकेने टाकलेला विश्वास गतवर्षी सार्थ ठरविल्यामुळे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह (Pimpri-chinchwad ) यांनी पुन्हा एकदा मालमत्ता कराच्या बिलांचे वाटप बचत गटातील महिलांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाला सिध्दी 2.0 प्रकल्प असे नाव देण्यात आलेले आहे. या प्रकल्पाचे समन्वयन व पर्यवेक्षण राज्य शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे.

बचत गटातील महिलांना प्रशिक्षण

मालमत्ता करांची बिले वाटपासंदर्भात महिलांना कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात  मंगळवार ( दि. 2 एप्रिल ) रोजी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कर संकलन विभागाचे सर्व प्रशासन अधिकारी, सहायक मंडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये महिलांना मालमत्ता कराविषयी मुलभूत माहिती, बिल नेमके कसे असते, बिलांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो, याची सविस्तर माहिती देण्यात आली. सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी गतवर्षी राबविलेल्या उपक्रमाचे झालेले फायदे, आलेल्या अडचणी या संदर्भात मार्गदर्शन केले. गतवर्षीच्या अडचणी पुन्हा येऊ नये, यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत, याचीही चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर प्रत्येक महिलेला दोन हजारपेक्षा जास्त बिले वाटपाचे काम देण्यात येणार नाही जेणेकरून सर्व महिलांना बिल वाटपाचे मानधनाची रक्कम समान मिळेल.

एका बिलासाठी महिलांना मिळणार 20 रूपये

मालमत्ता कराचे बिल वाटण्यासाठी महापालिकेच्या वतीने महिलांना गतवर्षी एका बिलासाठी 15 रूपये देण्यात आले होते. मात्र, यंदा यामध्ये वाढ करून प्रत्येक बिलासाठी 20 रूपये देण्यात येणार आहेत. यावर्षी देखील सिध्दी ॲपच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. यावेळचे सिध्दी ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिलांनी मालमत्तेचा मोबाईल क्रमांक हा एसएमएस पाठविण्याच्या दृष्टीने व सर्व सेवा ऑनलाइन मिळण्यासाठी अत्यंत  महत्त्वाचा आहे.  तसेच  पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सर्व सेवा ओटीपी बेस असल्यामुळे मालमत्ता धारकाने आपला अचूक मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदा ॲपमधून प्रत्येक मालमत्तेचा मोबाईल क्रमांक ओटीपीव्दारे शहानिशा केला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त मोबाईल क्रमांक मिळण्यास आणि नागरिकांचा व्यक्तिगत डेटा सुरक्षित ठेवण्यास प्राधान्य दिले जाणार आहे .  यंदाही पहिल्या तिमाहीत पाचशे ते साडे पाचशे कोटी रूपयांपर्यंत मालमत्ता कर वसूल होईल, अशी आशा सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

बिलांचे वाटप  दिड महिन्यात पूर्ण होणार

गतवर्षी कर संकलन विभागाने पालिकेच्या इतिहासातील 977 कोटी 50 लाख रूपयांचा कर वसूल केला आहे. आगामी वर्षात नवीन उच्चांक गाठण्यासाठी 2024-25 च्या आर्थिक वर्षाला सुरूवात होताच सहायक आयुक्त नीलेश देशमुख आणि त्यांची टीम कार्यरत झाली आहे. त्यानुसार मालमत्तेची कोरी बिले ही छपाईसाठी गेली असून ती बिले 10 एप्रिलपर्यंत कर संकलन विभागाला मिळणार आहेत. दि. 10 ते 15 एप्रिल या कालावधीत दोन-दोन हजार बिलांचे गट्टे करण्यात येणार आहेत. त्यानंतर ती बिले बचत गटातील महिलांकडे  सुपूर्त केली जाणार आहेत. बिलांचे वाटप 15 एप्रिल ते 31 मे या कालावधीत करण्यात येणार आहे.

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह  म्हणाले की, गतवर्षी  सिध्दी प्रकल्पाचा महापालिकेला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. गतवर्षी तब्बल साडेतीनशेपेक्षा जास्त महिलांना अवघ्या दिड महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला. बचत गटातील महिलांना पारंपारिक क्षेत्रे सोडून हे एक रोजगाराचे नवे दालन पालिकेने खुले केले. यंदाही आम्ही  सिध्दी 2.0 प्रकल्प राबविणार आहोत. या प्रकल्पाच्या माध्यमातून ॲपमध्ये मालमत्ता धारकाचा मोबाईल क्रमांक पडताळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बिल दिल्यानंतर नागरिकांचा मोबाईल क्रमांक ॲपमध्ये टाकल्यानंतर एक ओटीपी संबंधित मालमत्ता धारकांना जाईल. तो ओटीपी ॲपमध्ये टाकल्यानंतर तो मोबाईल क्रमांक पडताळण्यास मदत होईल. त्याचबरोबर नागरिकांना महापालिकेच्या सर्व ऑनलाइन सेवा ओटीपीवर  आधरित  मिळणार आहेत त्यामुळे नागरिकांची व्यक्तिगत माहिती सुरक्षित राहण्यास मदत होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.