Pimpri-chinchwad : निवेदक म्हणून मिळालेला माझा हा पहिलाच पुरस्कार – मंजिरी धामणकर

एमपीसी – निवेदक म्हणून मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. निवेदनातील वेदना कमी नसतात तसेच  निवेदकांना पुरस्कार मिळणं तसं दुर्मीळच असतं असे उद्गार  सुप्रसिद्ध सूत्रसंचालिका मंजिरी धामणकर (Pimpri-chinchwad) यांनी व्यक्त केले.

‘ मैत्रेय ‘ या संस्थेच्या वतीने त्यांना रविवारी (७ एप्रिल) अकरावा दिवंगत सतीश दिवाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ गायिका विदुषी आशा खाडिलकर यांच्या हस्ते मंजिरी धामणकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ गायक व अभ्यासक डॉ. रवींद्र घांगुर्डे, मधु जोशी, डॉ. श्रीरंग गोखले, मंजुश्री दिवाण – वेल्हाणकर उपस्थित होत्या.

Loksabha election 2024 : ब्राह्मण समाजाच्या सर्व संस्थांचा महायुतीला पाठिंबा

सत्काराला उत्तर देताना धामणकर पुढे म्हणाल्या की, ‘मी अपघातानेच निवेदन क्षेत्रात आले. सुरुवातीच्या काळात गायन शिकत होते. पण गाण्यात तशी फारशी प्रगती होत नव्हती. अचानकपणे एके दिवशी अपघातानेच एका कार्यक्रमाचे निवेदन करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीने मला वेगळी दिशा दाखवली. मी ते निवेदन अत्यंत उत्तमपणे केले आणि हे क्षेत्र मला खूपच आवडले. या निवेदन क्षेत्राने माझ्या पदरात भरभरुन समाधान दिले. पण अनेकदा कार्यक्रम होण्यापूर्वी आदराने, प्रेमाने बोलणारे संयोजक कार्यक्रम संपल्यानंतर मात्र ‘हम आपके है कौन’ असे वागतात ते खटकते’.

यावेळी बोलताना आशा खाडिलकर म्हणाल्या, ‘निवेदकाचा सत्कार होणे हे या कार्यक्रमाचे वेगळेपण आहे आणि ही मित्राच्या स्मरणार्थ सजवलेली मैफील आहे. आजकालच्या युगात नाती जपणे दुर्मीळ झाले आहे. अशावेळी मित्राच्या स्मृतीनिमित्त पुरस्कार दिला जाणे हे विशेष आहे. मंजिरीताईंसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा हा बहुआयामी रसिकांकडून सन्मान आहे’.

या पुरस्कार समारंभानंतर ‘शब्दमैफल’ हा सुमधूर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी मंजुश्री दिवाण – वेल्हाणकर, कुमार करंदीकर, श्रुती करंदीकर, हर्षला देव व उदय कुलकर्णी यांनी गीते सादर केली. ‘ये जवळी घे जवळी, गुरु एक जगी त्राता, पर्ण पाचू सावळा सावळा, खेड्यामधले घर कौलारु, केतकीच्या बनी तिथे, हा माझा मार्ग एकला, राजहंस सांगतो, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, स्वप्नातल्या कळ्यांनो, हा साधा प्रश्न’ ही गीते सादर करण्यात आली.

या कार्यक्रमाचा समारोप ‘ रघुरायाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण ‘ या गीतरामायणातील अजरामर गीताने झाला. या कार्यक्रमात (Pimpri-chinchwad) संवादिनी साथ उदय कुलकर्णी व कुमार करंदीकर यांनी केली. दमदार तबलासाथ विघ्नहरी देव यांनी केली. तसेच तालवाद्यांची साथ उर्मिला भालेराव यांनी केली.

यावेळी देण्यात आलेल्या मानपत्राचे लेखन विशाखा कुलकर्णी यांनी केले. वाचन मृणाल गोसावी यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आणि त्यानंतर सादर झालेल्या मैफलीचे ओघवते आणि अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन संजय गोसावी यांनी केले. आभार अद्वैत दिवाण  यांनी  मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.