Pimpri : देखावे पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांची झुंबड

एमपीसी न्यूज – अनंत चतुर्दशीला अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने गणेश दर्शनासाठी भाविक बाहेर पडले. रविवारी लाडक्या बाप्पाचे विसर्जन होणार असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी शहरासह आदी भागात गणेशभक्तांची एकच गर्दी झाली होती. त्यामुळे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. देखावे पाहण्यासाठी काही मंडळांच्या मंडपासमोर रांगा लागल्या होत्या. 

शहर व परिसरातील अनेक मंडळांनी यावर्षी वैविध्यपूर्ण देखावे सादर केले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली. घरगुती विसर्जनानंतर कालपासून गर्दीचा ओघ वाढत चालला आहे. आज आठवा दिवस असल्याने या गर्दीत वाढ झाली.

दुचाकीवरुन गणेश दर्शन

रात्री उशिरापर्यंत सर्वच रस्त्यांवर गर्दी दिसून येत होती. तसेच रात्रभर चहाच्या टप-या, आईस्क्रीमची दुकाने याचबरोबर विविध खाद्य पदार्थ विकणा-या विक्रेत्यांकडेही मोठी गर्दी झाली. त्यामुळे या व्यापा-यांचाही चांगलाच फायदा झाला. महिला, बालचमू, अबालवृद्ध सा-यांनीच गणेश दर्शनासाठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. अधिक आकर्षक मूर्ती व विद्युतरोषणाई केलेल्या मंडळांकडे गर्दी होताना दिसत होती.

अनेकांनी दुचाकीवरुनच गणेश दर्शन घेण्याचा लाभ घेतला. गणेशोत्सवास उत्साहाने प्रारंभ झाला आहे. अनेक मंडळांनी विधायक कार्यांना सुरुवात केली आहे. काही मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. काही मंडळांनी सजावटीवर भर दिला आहे. शहरातील विविध मंडळांनी महाप्रसाद, गणहोम आयोजित केला होता. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. रहदारी पोलिसांनी काही ठिकाणी गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर तीन ते चार दिवसांनंतर गणेशमूर्ती व देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी अधिक होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.