Pimpri: ‘ऑप्टिकल’ व्यावसायालाही ‘कोरोना’चा फटका !

एमपीसी न्यूज – जगातील 160 पेक्षा अधिक देशात फैलावलेल्या कोरोनाचा भारतासह महाराष्ट्रावरही मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील विविध व्यावसायिकांना कोरोनाचा फटका बसला आहे. यामध्ये ‘ऑप्टिकल’ व्यावसायालाही मोठा फटका बसला असून, चीनमधून येणारे चष्मे, ग्लास, गॉगल, लेन्स येणे गेल्या तीन महिन्यापासून बंद झाले आहे. त्यामुळे चष्मे, ग्लास, गॉगलच्या किंमती 15 ते 20 टक्यांनी वाढल्या आहेत.

चीनमध्ये चष्मे, ग्लास, गॉगल, लेन्सची मुख्य बाजारपेठ आहे. चीनमधून भारतात सुमारे 80 ते 90 टक्के फॅन्सी चष्मे, ग्लास, फायबर, गॉगल, लेन्स येतात. मात्र, कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यापासून चीनमधील उत्पादन बंद झाले आहे. तसेच आयात-निर्यातही बंद झाली असल्याने चीनमधून चष्मे, ग्लास, गॉगल, लेन्स आदी ऑफ्लिटल क्षेत्रातील साहित्य येणे बंद झाले आहे. त्यामुळे या सर्व वस्तू 15 ते 20 टक्यांनी महाग झाल्या आहेत.

भारतामध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे चार महिने उन्हाळ्याचे असतात. या कालावधीत फॅन्सी गॉगल, चष्म्यांना मोठी मागणी असते. मात्र, चीनमध्येच कोरोनाने हाहाकार उडाल्याने सर्व उत्पादन बंद आहे. परिणामी भारतात चष्मे, गॉगल, लेन्सस आदी ‘ऑप्टिकल’चे साहित्य महाग झाले आहे. नागरिकही कोरोनाच्या भितीने बाहेर पडत नसल्याने याचा मोठा फटका ‘ऑप्टिकल’ व्यावसायाला बसला आहे.

याबाबत पिंपरीतील लेन्स कॉर्नरच्या प्रमुख सुरेखा पाटील म्हणाल्या, चष्मे, ग्लास, गॉगल, लेन्सचे उत्पादन चीनमध्ये सर्वाधिक होते. चीनमधून येणारे आकर्षक चष्मे, गॉगलला भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. मात्र, कोरोनामुळे चीनमधील गेल्या तीन ते चार महिन्यापासून उत्पादन बंद असून, आयात-निर्यातही बंद आहे. त्यामुळे भारतातील चष्मे, ग्लास, गॉगल, लेन्सच्या किंमतीमध्ये 15 ते 20 टक्यांची वाढ झाली आहे.

त्रिवेणीनगर येथील इंद्रायणी ऑफ्टिकलच्या संचालिका दिपज्योती यादव म्हणाल्या, चीनमधून येणारे चष्मे, ग्लास, गॉगल, लेन्स बंद झाल्याने भारतात या सर्व साहित्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही चष्मे, गॉगलच्या किंमतीत वाढ झाली आहे. उन्हाळ्यात नागरिक फॅन्सी, गॉगल, चष्मे घेण्यास प्राधान्य देतात. मात्र, कोरोनाच्या भितीने नागरिक घराबाहेर पडत नाहीत. यामुळे ऐन उन्हाळ्यात ‘ऑप्टिकल’ व्यावसायीकांनाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.