Pimpri Corona News: संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सूक्ष्म नियोजन :  आयुक्त पाटील

 प्रभाग स्तरावर कोविड दक्षता समिती स्थापन करण्याचे विचाराधीन 

एमपीसी न्यूज – कोविड 19 आजाराच्या संभाव्य तिस-या लाटेला परतवून लावण्यासाठी महापालिका सूक्ष्म नियोजन करणार आहे. व्यवस्थापन आणि अंमलबजावणीकरीता प्रभाग स्तरावर कोविड दक्षता समिती स्थापन करण्याचे विचाराधीन असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

कोविडच्या संभाव्य तिस-या लाटेमध्ये  घ्यावयाची काळजी तसेच  तातडीने करावयाच्या उपाययोजना या संदर्भात  आयुक्त पाटील यांनी आज (शनिवारी) गुगल मीटद्वारे अधिका-यांशी चर्चात्मक संवाद साधला.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे,   सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी  डॉ.लक्ष्मण गोफणे,  उप आयुक्त मनोज लोणकर, मंगेश चितळे, चंद्रकांत इंदलकर, अजय चारठणकर, संदीप खोत, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे,   डॉ.वर्षा डांगे यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि महापालिका विभागीय रुग्णालयांचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी  ऑनलाईन उपस्थित होते.

कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयामध्ये कोविड दक्षता समिती स्थापन करणे, क्षेत्रीय स्तरावर सुसज्ज वॉर रुम कार्यान्वित करणे, कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण नियोजन करणे, कोविड केअर सेंटर सुरु करणे, नवीन RTPCR Testing सेंटर सुरू करणे, लहान बालकांचे नियमित लसीकरण करण्यासाठी मोहिम राबविणे, गृह विलगीकरणाला कमीत कमी परवानगी देवून जास्तीत जास्त संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर देणे यावर चर्चा करण्यात आली.

तसेच सुपर स्प्रेडर्सच्या नियमित कोरोना चाचण्या करणे, शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांचे लसीकरण व दुर्धर आजार असणा-यांचे त्यांच्या घरीच लसीकरण करणे आदी विषयांबाबतही  बैठकीत चर्चा झाली. तसेच याबाबत अधिका-यांच्या  विविध सूचना व मते आयुक्त राजेश पाटील यांनी जाणून घेतली.

“मी जबाबदार” हे महापालिकेचे अधिकृत ऍप जास्तीत जास्त नागरीकांनी तसेच महापालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचा-यांनी मोबाईलवर डाऊनलोड करण्यासंदर्भात जनजागृती मोहिम प्रभावीपणे राबवावी. तसेच  विना मास्क बाहेर फिरणा-या नागरिकांवर  संबंधित क्षेत्रिय कार्यालयातील भरारी पथकांमार्फत कारवाई अधिक व्यापक पध्दतीने करण्याच्या सूचना यावेळी बैठकीत आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.